Breaking News

कोकण रेल्वेच्या पॅसेंजरमधून गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी

रत्नागिरी, दि. 12, एप्रिल - एक्स्प्रेस रेल्वे गाड्याने गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करताना रेल्वे पोलिस पकडून कारवाई करतात म्हणून काहींनी पॅसेंजर गाडीचा पर्याय निवडला होता. मात्र आरपीएफच्या पोलिसांनी पॅसेंजर गाडीतून मुंबईकडे होणारी गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी उघड केली. त्यामुळे मद्य तस्करी करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. रत्नागिरीहून दादर (मुंबई) कडे जाणार्यात पॅसेंजर गाडीमध्ये चार प्रवासी बॅग भरलेला मद्याचा साठा जप्त करण्यात आला. आरपीएफचे पोलीस निरीक्षक अविनाश कुमार आणि कर्मचारी विजय जाधव यांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. 


गोवा बनावटीच्या मद्याची कोकण रेल्वेमार्गाने नेहमी तस्करी होते. गोव्याहून मद्य घेऊन येणारे पोलिसांची नजर चुकविण्यासाठी नेहमी गाड्या बदलत असतात. चार प्रवासी बॅग भरून गोवा बनावटीच्या मद्याची रेल्वेने तस्करी सुरू होती. पॅसेंजर गाड्यांची रेल्वे पोलिस चौकशी करणार नाहीत, अशा अंदाजाने रत्नागिरी दादरला पॅसेंजरने मद्याची वाहतूक सुरू होती. सकाळी साडेसातच्या सुमारास गाडी चिपळूण स्थानकावर पोहोचल्यानंतर पोलीस निरीक्षक अविनाश कुमार यांनी गाडीची तपासणी केली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी ठरावीक डब्यांचा फेरफटका मारला. गाडीच्या एका डब्यात चार बॅगा संशयित आढळल्या. त्या बॅगांबाबत प्रवाशांना विचारले असता कोणीही त्या आपल्या मालकीच्या असल्याचे कबूल केले नाही. आरपीएफचे कर्मचारी विजय जाधव यांनी त्या बॅगा उघडल्यानंतर त्यामध्ये मद्य आढळले. प्रत्येकी 750 मिलिच्या एकूण 145 बाटल्यांमध्ये मद्य होते. चारही बॅगा रेल्वे पोलिसांनी जप्त केल्या. पंचनामा करून त्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे जमा करण्यात आल्या. कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची सुरक्षितता आमच्यासाठी महत्त्वाची आहे. गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदेशीर वाहतूक, चोरीचे प्रकार आणि इतर गैरकृत्य थांबविण्यासाठी आम्ही सीसीटीव्हीची मदत घेत आहोत. आमचे कर्मचारी 24 तास रेल्वे मार्गावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवून असतात. संशयितांची तत्काळ चौकशी केली जाते. त्यामुळेच चोरीचे प्रकारही आता कमी झाले आहेत, अशी माहिती अविनाश कुमार यांनी दिली.