अंगारकी चतुर्थीनिमित्त लाखो भाविकांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
अष्टविनायकांपैकी एक असलेल्या कर्जत तालुक्यातील सिध्दटेक येथील सिध्दीविनायक गणपतीचे अंगारकी चतुर्थीनिमित्त राज्यभरातील लाखो भाविकांनी दर्शन घेतले. पहाटेपासून सुरु असलेला भाविकांचा ओघ मंगळवारी रात्री चंद्रोदयानंतर ओसरला. मंदिराच्या उजव्या बाजूने भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. अंगारकी योगामुळे दर्शनासाठी प्रदक्षिणा मार्गावर एक किलोमीटर लांबीची रांग लागली होती.
काल पहाटे दोन वाजेपासून भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. पहाटे साडेपाच वाजता श्रीगणेशाची पूजा करुन नैवद्य दाखविण्यात आला. सकाळी साडेसात वाजेपासून भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढत गेला. बारामती, पुणे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर आदी भागातील कित्येक भाविक सिध्दटेकला मुक्कामी आले होते. देवस्थानचे भक्तनिवास तसेच हेमंत मगर यांचेकडून चालविण्यात येत असलेल्या योगराज लॉजिंगं अॅण्ड गार्डनमध्ये भाविक वास्तव्यास होते. दिवसभर राज्याच्या विविध भागातील सुमारे दोन लाख भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. रात्री चंद्रोदयानंतर मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कित्येक भाविक उपवास करतात. चंद्रोदयानंतर रात्री श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण करुन गणपती श्लोक वाचून भाविकांनी उपवास सोडला. चिंचवड देवस्थानच्या वतीने मंदीर परिसरात जागोजागी बॅरिकेट्स लावून भाविकांच्या रांगा नियंत्रित केल्या. देवस्थानच्या वतीने मंदीर परिसरात भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने मंदीर परिसराची स्वच्छता ठेवण्यात आली. दर्शनरांगेवरील शेडचे काम अपूर्ण राहिल्याने मोकळ्या सांगाड्यांखाली भाविकांना उन्हाचा तडाखा सहन करीत मंदिरापर्यंत पोहोचावे लागले. वाहतूक पोलिसांच्या अभावामुळे मंदिराला जोडणार्या सर्व रस्त्यावर वाहतुकीची सतत कोंडी होत होती. त्यामुळे भाविकांना ताटकळत रहावे लागले.
व्यावसायिकांच्या गोंगाटाने भाविक त्रस्त
सिद्धिविनायक मंदीरासमोर तसेच बाहेर वडाच्या झाडाखाली व्यावसायिकांच्या अतिक्रमनामुळे मंदीर परिसरात गोंगाटाचे वातावरण होते. रसवंतीगृहांच्या इंजिन व घुंगरांचा आवाज, व्यावसायिक, विक्रेत्यांच्या आरोळ्यांनी भाविक त्रस्त झाले होते. मंदिरासमोर दगडी फरशीवर अतिक्रमण करुन व्यवसाय थाटल्याने भाविकांना मंदीरापर्यंत पोहोचण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली.प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच नियोजन समितीकडून या प्रश्नावर कसलाच निर्णय घेतला जात नसल्याने गणेशभक्त वैतागून गेले आहेत.
आरोग्य विभागाने शब्द पाळला
सिध्दटेक येथील आरोग्य उपकेंद्र उघडले जात नसल्याने भाविक तसेच स्थानिक नागरिकांना आरोग्य सुविधांपासुन वंचित होते. दै. लोकमंथनने या प्रश्नावर वृत्तमालिकेतुन विशेष वृत्त प्रसिद्ध करुन आरोग्य विभागाचे लक्ष वेधले होते.त्यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी चतुर्थीला भाविकांसाठी आरोग्य केंद्र उघडून सेवा दिली जाईल असे स्पष्ट केले होते.त्यानुसार अनेक महिन्यांनी उपकेंद्र उघडण्यात आले. मात्र पुढील प्रवेशद्वारात व्यावसायिकांनी थाटलेल्या दुकानांमुळे हा दरवाजा उघडणे मुश्किल झाले. अखेर मागील दरवाजा उघडून भाविकांना आरोग्य सुविधा पुरविण्यात आल्या.
प्रदक्षिणा मार्गावर ट्रेलर फसला
प्रदक्षिणा मार्गावरील शेडचे काम मुदतीत पूर्ण झाले नसल्याचा फटका भाविकांना बसला. शेड करण्यासाठी तयार केलेल्या खड्ड्यात ट्रेलर फसल्याने भाविकांना रस्त्यात अडथळा निर्माण झाला. मार्गाच्या दोन्ही बाजूने खोदलेले खड्डे चुकवत भाविक मंदिराच्या दिशेने येत होते. सकाळी 11 वाजेपर्यंत गर्दी असल्याने भाविकांना अधिकच त्रास सहन करावा लागला.