Breaking News

दखल - माध्यमांच्या विश्‍वासार्हतेचे मुसळ केरात!

वृत्तपत्र ही समाजाचा आरसा आहेत. समाजाचे प्रतिबिंब समाजाला दाखविणारे. आरशाला तडा गेला तर हा चेहरा विद्रूप दिसतो. आरशाची विश्‍वासार्हता धोक्याच्या पातळीवर उभी ठाकते आणि मग आरशापासून तोंड लपविण्याची वृत्ती कळत न कळत पोसली जाते. अलिकडच्या काळात वृत्तपत्ररूपी आरसा या धोक्याच्या पातळीवर उभा आहे. वृत्तपत्रांची नव्हे तर आज प्रचलित असलेल्या माध्यमांच्या विश्‍वासार्हतेवर निर्माण झालेले प्रश्‍नचिन्ह सकस विचारसरणीचा समाज घडविण्याच्या प्रक्रियेतील मोठा अडसर ठरते आहे. गेल्या दोन दिवसात घडलेल्या दोन घटनांनी ही शोकांतिका अधोरेखीत झाली आहे.

भारतीय वृत्तपत्रसृष्टीला सकस विचारांचा दमदार वारसा आहे. भारताला राजकीय, रामाजिक, आणि वैचारिक गुलामगिरीतून बाहेर काढण्याची ताकद केवळ आणि केवळ वृत्तसृष्टीत आहे हे भुतकाळाने आणि वर्तमानकाळानेही तितक्याच जबाबदारीने सिध्द केले आहे. या ताकदीच्या बळावर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ बनण्याची पात्रता निर्माण केली. काळाच्या बदलत्या प्रवाहात या अभिव्यक्तीचे रूपडे बदलत गेले, अधिकाधिक स्मार्ट होत असतांना जाणते अजाणतेपणे मुळ स्वभावात मात्र कुरूपता येऊ लागली. आपला इतिहास काय? आपली ध्येय काय? आपली जबाबदारी काय? समाजाच्या आपल्याकडून अपेक्षा काय? या गोष्टी शेवटच्या रांगेत नेऊन बसविण्याची मानसिकता वाढीस लागली. आम्ही माध्यम प्रवृत्ती कुणाचे तरी भाट आहोत, आमच्या प्रत्येक शब्दाची किंमत वसूल करण्याचा आमचा जन्मसिध्द हक्क आहे, ही वृत्ती सध्या माध्यम क्षेत्रात बोकाळल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर आमच्या परंपरागत जबाबदार्‍या आणि त्यासोबत परंपरेने आलेली विश्‍वासार्हता आम्ही लिलावात काढीत आहोत.

समाजाचा आरसा म्हणून काम करणारी आमची जातकुळी आज आमच्या कर्माने आमच्या सोबत या समाजालाही फरफटत नेत आहोत याचे भान राहीले नाही. एके काळी वृत्तपत्रात छापला गेलेला प्रत्येक शब्द विश्‍वाचे अंतिम सत्य मानले जाते, आज मात्र सत्य घटना छापली तरी वाचकांचा विश्‍वास बसणे मुश्कील बनले आहे. का घडू लागले असे? कुणामुळे निघाली विश्‍वासार्हता मोडकळीस? याचा विचार करणे काळाची गरज बनली आहे. आम्ही निकोप स्पर्धा वैचारिक पातळीवर करण्याऐवजी व्यक्तीगत हेवेदाव्यांवर, स्वार्थी हेतू ठेवून धंदेवाईक वृत्तीने स्पर्धा करू लागलो आणि आमच्या वृत्तपत्रसृष्टीच्या विश्‍वासार्हतेवर कुर्‍हाड मारली. या ठिकाणी केवळ मुद्रीत माध्यमांचा प्रकर्षाने विचार करतो आहोत. कारण तमाम प्रचलित माध्यमांविषयी भाष्य करावे एव्हढी त्या माध्यमांची पात्रता नाही, त्यांचा इतिहास नाही किंबहूना त्या माध्यमांचा जन्मच मुळी प्रदुषित वातावरणात झाल्याने निकोप स्पर्धा किंवा विश्‍वासार्हता याविषयी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगणे तितकेसे यथोचित ठरणार नाही.

हा उहापोह या ठिकाणी करण्याचे कारण असे की, एका स्वयंघोषित क्रमांक एकच्या माध्यम समुहाने गेल्या एकदोन दिवसात लावलेले दिवे. कुठल्या तरी व्यावसायिक उद्देश नजरेसमोर ठेऊन झालेल्या त्यांच्या कथित समाजाभिमुख उपक्रमात अशाच एका विद्वान संपादकाने मुख्यमंत्र्यांची जाहीर मुलाखत घेतांना तोडलेले तारे आणि त्या माध्यम समुहाने एका केंद्रीय मंत्र्यांचा केलेला जाहीर गौरव. मुळात ही मुलाखत घेण्याचा प्रपंच मुलाखत घेणार्‍या संपादकाच्या राजकीय पक्षालाही रूचला नाही, जनतेला तर त्याचा उद्देशच समजला नाही. ज्या केंद्रीय मंत्र्यांचा गौरव करून माध्यम समुहाने राजकीय आणि आर्थिक प्रतिष्ठा वाढविण्याचा उद्देश सफल केला ते केंद्रीय मंत्री आपल्या पत्नीच्या अपसंपत्तीच्या मुद्यावरून देशभर चर्चेत आहे. सार्‍या देशाची माध्यम यंत्रणा ज्या व्यक्तीविषयी भ्रष्ट असल्याचा संशय व्यक्त करते ती व्यक्ती या माध्यम समुहाला गौरवोचित वाटते. यात विश्‍वासार्हतेचा जाहीर लिलाव झाला असे वाटणे गैर काय? जनतेने कुणावर विश्‍वास ठेवायचा? भ्रष्ट म्हणणार्‍या माध्यमांवर की गौरव करणार्‍या माध्यमांवर? एकुणच विश्‍वासार्हतेचे मुसळ केराता रूतले हे मात्र नक्की.