निरंतर अभ्यासाने मोठा बदल : पाटील
निरंतरअभ्यास केल्यास विद्यार्थ्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो, असे मत सरपंच प्रकाश पाटील यांनी व्यक्त केले. कोल्हार खुर्द येथे रयत शिक्षण संस्थेच्या ‘रयत टॅलेंट सर्च’ या परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.
रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्षेत्रात सर्वात मोठी समजली जाणारी ‘रयत टॅलेंट सर्च’ या परीक्षेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून ७ हजार ७०० विद्यार्थी बसले होते. यामध्ये उत्तर विभागातील नगर, बीड, नाशिक, धुळे आणि नंदूरबार या पाच जिल्ह्यांतून १६५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी कोल्हार न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे १० विद्यार्थी चमकले. यापैकी ७ विद्यार्थी हे कोल्हार खुर्दचे आणि जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. कोल्हार खुर्दचे नाव रयत शिक्षण संस्थेच्या पटलावर झळकले असल्याने या विद्यार्थ्यांचा कोल्हार ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद शाळेच्यावतीने संयुक्त सत्कार आयोजित करण्यात आला होता.
या सत्कारप्रसंगी सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह सरपंच प्रकाश पाटील, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्यध्यलिका झिने एस. बी., पठारे व्ही. एस, पवार. आर. व्ही. तांबे. एस. जी. शिंदे ए. के., शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर घोगरे, रयत शाळेचे शिक्षक खंडागळे एस. सी. सोनावणे एस. के., राजेंद्र लोंढे, गोपीनाथ दळे, महिपती शिरसाठ, ग्रामविकास अधिकारी गोसावी पी. एस. आदींच्या हस्ते यशस्वी विद्यार्थी तनुजा शिरसाठ, पल्लवी लावरे, श्रेया खंडागळे, श्रुती खंडागळे, प्रणव दळे, स्नेहल चांडोले, विकास शिरसाठ, हेमंत चौरे साक्षी भोसले, सिद्धांत काळे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या यशात रयत शाळेच्या शिक्षकांचा देखील मोलाचा वाट आहे. त्यामुळे त्यांचादेखील ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन तांबे. एस. जी. यांनी केले. झिने एस. बी. यांनी आभार मानले.