Breaking News

दखल - सवत रंडकी होण्याची खा. गांधीची भूमिका

राज्यातील भाजपत जशी गटबाजी आहे, तशी ती नगर भाजपमध्येही आहे. ती पूर्वीपासून आहे. त्यात भाजपचं नुकसान झालं आहे. दिलीप गांधी जरी लोकसभेवर निवडून येत असले, तरी भाजपच्या ताब्यात नगरची महानगरपालिका आणि आमदारकी कधीही आलेली नाही. गटबाजीच त्याला कारणीभूत आहे. गांधी व माजी नगराध्यक्ष अभय आगरकर यांच्यात ही गटबाजी असून या दोन्ही गटांनी परस्परांचं वस्त्रहरण वारंवार केलं आहे. मागं नगरमध्ये आलेल्या महनीय पाहुण्यांचे दोनदा स्वागत, दोनदा सत्कार असे प्रकार घडले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनाही हा अनुभव आला आहे. प्रदेशस्तरावरून ही गटबाजी थांबविण्याचे फारसे प्रयत्न झाले नाहीत. श्रीपाद छिंदम याने शिवरायांविषयी अनुद्गार काढल्यानंतर भाजपतील गटबाजी पुन्हा उफाळून आली.

छिंदमला उमेदवारी देण्यापासून त्याला उपमहापौरची उमेदवारी द्यायलाही आगरकर गटाचा विरोध होता. छिंदमचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आगरकर गटाने गांधी गटावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला, तर युतीत भाजपच्या वाट्याला उपमहापौरपद असूनही छिंदम प्रकरणानं नाचक्की झाल्यामुळं आता उपमहापौरपद नको, असं सांगत उमेदवारी दाखल केली नसली, तरी त्यातून पक्षाचं नुकसान झाल्यापेक्षा आपल्याच एका गटाची कशी जिरवली, यात भाजपला आनंद आहे. गांधी व अ‍ॅड. आगरकर यांच्यातील संघर्ष अजून शिगेला पोहचण्याची चिन्हे आहेत. छिंदम प्रकरणाचे प्रायश्‍चित्त घ्यायच्या कारणावरून गांधी गटानं आगरकर गटाकडं जाऊ पाहणारं उपमहापौरपद रोखलं आहे. छिंदम प्रकरणाचं निमित्त करून आगरकर गटानं खासदार गांधी यांची शहर जिल्हाध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्याची मागणी श्रेष्ठीकडं केली होती. या पार्श्‍वभूमीवर याच श्रेष्ठीच्या मदतीनं गांधी यांनी आगरकर गटाला धोबीपछाड देत उपमहापौरपदापासून दूर राहण्यास भाग पाडलं आहे. छिंदममुळं खासदार गांधी पक्षांतर्गत राजकारणात अडचणीत आले आहेत. 

छिंदमची पक्षातून व उपमहापौरपदावरून गच्ंछती केली असली, तरी त्याला ताकद देण्याचं काम गांधींनी केलं असल्यानं छिंदम प्रकरणी त्यांच्यावरही कारवाई व्हावी व शहर जिल्हाध्यक्षपदावरून गांधी यांना हटवाव, अशी मागणी अ‍ॅड. आगरकर व त्यांच्या समर्थकांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडं केली होती. या मागणीची मागील 8-10 दिवसांत श्रेष्ठींनी काहीच दखल घेतली नसल्यानं आगरकर गट नाराज होता. अशा स्थितीत छिंदमच्या राजीनाम्यानं रिक्त झालेल्या उपमहापौरपदी आपल्या समर्थकांची वर्णी लावण्याची तयारी या गटानं केली होती. बाबासाहेब वाकळे यांचं नावही निश्‍चित झालं होतं; पण ऐनवेळी खासदार गांधींनी दानवे यांच्याकडं धाव घेऊन छिंदम प्रकरणाचं प्रायश्‍चित्त म्हणून उपमहापौरपदाची निवडणूक भाजपनं लढवूच नये, अशी भूमिका मांडली. छिंदम प्रकरणामुळं शहरात भाजप टीकेचा धनी झाला असल्यानं उपमहापौरपदाची उमेदवारीच केली नाही, तर पक्षाची प्रतिमाही उजळून निघेल, असा विश्‍वास दानवे यांना वाटल्यानं त्यांनी ती मान्य करून तसे आदेश दिले व आगरकर गटाच्या भाजप इच्छुकांच्या हालचाली थंडावल्या; मात्र या प्रकाराचा बदला आता आगरकर गटाकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. 

‘गांधी हटाव’ची मागणी पुन्हा उचल खाण्याची शक्यता आहे. भाजपचे मनपातील गटनेते दत्ता कावरे हे आगरकर गटाचे समर्थक आहेत. उपमहापौरपद वाटपात पहिलं सव्वा वर्ष गांधी गटाला व नंतरचं सव्वा वर्ष आगरकर गटाला ठरलं होतं; पण गांधी गटाच्या छिंदमनं सव्वा वर्षांनंतर राजीनामाच दिला नाही. मात्र, आता त्याची गच्ंछती होऊन हे पद रिक्त झाल्यानं आगरकर गटानं त्यावर दावा केला होता. छिंदम प्रकरणावरून गांधी गटाला या पदावर आपला उमेदवार देणं अडचणीचे होतं; पण अशा स्थितीत आगरकर गटाकडं जाणारं हे पद गांधींनी श्रेष्ठीच्याच मदतीनं हाणून पाडल्यानं त्याचा राग आगरकर समर्थकांना आहे. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजप नगरसेवक मतदानही करणार नसल्याचं खा. गांधी सांगत असल्यानं राष्ट्रवादीचा उपमहापौर होऊ शकतो. त्यामुळं भाजपनं उमेदवारी न करणं, ही त्यांची राष्ट्रवादीला मदत करण्याचीच खेळी असल्याचा आरोप कावरे करतात. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी मात्र दोन्ही गटांच्या वादात ‘तटस्थ’ राहण्याची भूमिका घेतल्यानं आगरकर गट एकाकी पडला आहे. उद्या उपमहापौरपदाची निवडणूक आहे. खा. गांधी यांचा एकाचवेळी शिवसेना व पक्षांतर्गत विरोधकांना शह देण्याची ही खेळी असू शकते. माजी आमदार अनिल राठोड व खा. गांधी यांचे विळ्याभोपळ्याचे नाते जगजाहीर आहे. त्यामुळं सध्या खा. गांधी यांनी ‘नवरा मेला, तरी चालेल; परंतु सवत रंडकी झाली पाहिजे,’ अशी भूमिका घेतली आहे.