नुकत्याच झालेल्या त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यातील विधानसभा निवडणूकांचे निकाल हाती आले असून, त्रिपूरात आणि नागालँडमध्ये भाजपाने सत्तेच्या दिशेने कुच केली आहे, तर मेघालयामध्ये त्रिशंकु परिस्थिती असून, काँगे्रस सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. त्रिपुरांमध्ये अनेक वर्षांपासून डाव्यांची सत्ता होती. मात्र डाव्याच्या कारभाराला कंटाळलेले लोक, भाजपचे अच्छे दिनांचे गाजर त्रिपुरामध्ये पुन्हा यशस्वी झाल्याचे चित्र आहे. त्रिपूरा हे भारतातील ईशान्येतील सर्वांत छोटेखाी राज्य. अनेक वर्षांपासून कम्युनिस्टांची येथे सत्ता आहे. कम्युनिस्टांनी आपल्या सत्ताकाळात आपला खरा मित्र कोन आणि खरा शत्रु कोण याची पडताळणी कधी केलीच नाही. तसेच राजकीय हवामानाचा अंदाज देखील माणिक सरकारला आला नाही. परिणामी कम्युनिस्टांचा एक गड पुन्हा कोसळला. 2014 मध्ये देशभरात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, आणि त्यांनी एक एक राज्य काबीज करण्याचा धडाका लावला. मोदी सरकारच्या ‘ऍक्ट ईस्ट’ धोरणांची खरी गोम आता राजकारण्यांना कळायला लागली आहे. ‘ऍक्ट ईस्ट’ चा नारा देत भविष्यातील निवडणूकांत या राज्यात भाजपची सत्ता असेल, तिथे विकासाची गंगा आणू असे स्वप्न मोदी यांनी बघितले आणि त्यांनी त्या दिशेने पावले टाकण्यास सुरूवात केली होती. मात्र कम्युनिस्टांसह काँगे्रसने मोदी यांच्या ‘ऍक्ट ईस्ट’ या धोरणांकडे लक्ष दिले नाही, की आपल्याला हा ईशान्येकडील राज्यांतील निवडणूकासांठी इशारा आहे, हे त्यांच्या लक्षात आलेच नाही. त्यामुळे त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजपा सहज यश मिळवू शकले असेच म्हणावे लागेल. त्रिपुरामध्ये भाजपाने केलेली पक्षबांधणी, आणि दिलेले आश्वासन आणि प्रचाराची थीम या जोरांवर भाजप त्रिपुरात सत्तेत दाखल होतील, असा अंदाज वर्तविण्यात येत होते, ते अंदाज खरे ठरले. त्रिपुरात भाजपला 43 तर सत्ताधारी सीपीएमला 16 जागा मिळाल्या. तर काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही. मात्र मेघालयात काँगे्रसच सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. मेघालयात 22 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. येथे भाजपला 2 तर एनपीपीला 19 जागा मिळाल्या आहेत. गोव्यात सर्वांत मोठा पक्ष म्हणून काँगे्रस म्हणून आल्यानंतरही वेळीच सजगता न दाखवल्यामुळे तिथे भाजपाने सत्ता स्थापन केली होती. ती चुक पुन्हा मेघालयात होऊ नये, म्हणून काँगे्रसचे दूत एव्हनाच मेघालयात दाखल झाले आहे. तर दुसरीकडे नागालँडमध्येही कोणालाही स्पष्ट बहुमत नाही. येथे भाजप 30 जागांसह सर्वात मोठा पक्ष बनला आहे. पूर्वोत्तर राज्यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजप सरकरला कौल दिला असल्याची प्रतिक्रीया पक्षाचे अध्यक्ष अमित शहांनी व्यक्त केली आहे. त्रिपुरात भाजप स्वबळावर तर मेघालय आणि नागालँडमध्ये सहकारी पक्षांच्या साथीने भाजप सरकार स्थापन करेल असा दावा त्यांनी व्यक्त केला आहे. त्रिपुरा नागालँडमध्ये भाजपाने यश मिळविले असले, तरी भाजपाने काही हुरळून जाण्याची गरज नाही. त्रिपुरा आणि नागालँड ही राज्ये ईशान्य भागांतील असून, इथे पाहिजे त्या गतीने विकास झाला नाही. त्यामुळे सत्ताबदलासाठी जनता उत्सुक होतीच. तीच नाडी पंतप्रधान मोदी यांनी चाणाक्षपणे हेरली. त्रिपुरा आणि नागालँउमध्ये जरी भाजपाने सत्ता मिळविली असली, तरी भाजपाची खरी कसोटी ही कर्नाटक, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये लागणार आहे. ही राज्ये ही मोठी आहेत, येथे मोदी यांच्या विकासकामांचा कस लागणार आहे. त्यांनी चार वर्षांत काय काम केले? याचे मूल्यमापन याच निवडणूकांत बघायला मिळणार आहे. जर या निवडणूकांत भाजपाने बाजी मारली तर 2019 मध्ये केंद्रात भाजपच बाजी माररू शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येईल. जर या राज्यात भाजपाची धुळधाण झाली, तर केंद्रात देखील भाजपात धुळधाण होईल, त्यामुळे भाजपाची खरी कसोटी येणार्या पुढील निवडणूकांत असेल. तर काँगे्रस या राज्यात कशी फाईट देतो, यावर काँगे्रसचे भवितव्य देखील अवलंबून असेल.
अग्रलेख भाजपची खरी ‘कसोटी’
Reviewed by Dainik Lokmanthan
on
22:51
Rating: 5