Breaking News

छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमली नेवासा नगरी


नेवासा / शहर प्रतिनिधी/ - सायंकाळी पाच वाजता शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळारूपी प्रतिमेची बस स्थानकापासून भव्य मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीच्या प्रारंभी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख, शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब पवार, शहरप्रमुख नितीन जगताप, मच्छिन्द्र म्हस्के, उत्सव समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ लष्करे, अंबादास लष्करे, बाळासाहेब कराळे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले.

मिरवणूक अग्रभागी भगवे झेंडे हाती घेतलेले शिवप्रेमी छत्रपती शिवरायांचा जयघोष करतांना दिसत होते. या मिरवणुकीचे सर्व पक्षीय सर्वधर्मीय बांधवांच्या वतीने पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. या मिरवणुकी प्रसंगी तोफांच्या सलामीने मानवंदना देण्यात आली. शहरातील रस्त्याच्या दुतर्फा लावलेले भगवे झेंडे व अश्वनृत्य मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले. काँग्रेसचे अध्यक्ष संजय सुखधान, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी शिव प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

सदरची मिरवणुक नगरपंचायत चौक, मारुती चौक मार्गे श्री मोहिनीराज मंदीर चौकात आली असता मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. शिवजयंती मिरवणूक शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बसस्थानाकाजवळ किसनगिरी बाबा तरुण मंडळाने शिवप्रतिमेचे पूजन केले. यावेळी माजी नायब तहसिलदार प्रदीप पाठक, राजेंद्र गायकवाड, एकनाथ गरुड, बापूसाहेब देवढे, संतोष कडू उपस्थित होते.