Breaking News

ऊस तोडणी मजुराच्या पत्नीची रस्त्यातच प्रसूती

श्रीगोंदा/ प्रतिनिधी/- ऊसतोडणी मजुराच्या पत्नीची रस्त्यावर प्रसूती झाली, मात्र आढळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेने तात्काळ मदत केल्यावर महिला व बाळ सुखरूप आहे याबाबत अधिकची मिळालेली माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यात सध्या ऊसतोडणी मजूर मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. या मजुरांचे कुटुंबही बरोबर असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत. असाच एक प्रसंग तांदळी दुमाला येथे घडला. या गावात ऊस तोडणी कामासाठी औरंगाबाद येथील मजूर आले आहेत. 


या मजुरातील किरण अर्जुन नाळे हि महिला गरोदर असल्यामुळे तीला सकाळीच त्रास होऊ लागला होता. म्हणून तिच्या घरच्या मंडळींनी तीला दुचाकी वरून आढळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन निघाले. पण हि महिला आढळगाव परिसरात आल्यावर तिला प्रसूतीवेदना त्रास अनावर झाला आणि तिची प्रसूती रस्त्यातच झाली. त्याचवेळी आढळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचे चालक बापू जाधव यांना फोन आला. रस्त्याच्या कडेला एक महिलाची प्रसूती झाली आहे अशी माहिती मिळाली. त्यावेळी बापू जाधव यांनी कोणताही विचार न करता लगेच त्या महिलेची ज्या ठिकाणी प्रसूती झाली. त्या ठिकाणी धाव घेतली व त्या महिलेला व तिच्या बालकाला घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. या ठिकाणी राणी पेगडवार यांनी त्या महिलेवर उपचार केले ती महिला व बाळ दोन्हीही सुखरूप आहेत.