Breaking News

मुख्य सचिव मारहाणप्रकरण आपच्या आमदारांना पोलिसांनी घेतले ताब्यात


नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी दिल्ली मुख्य सचिव अंशु प्रकाश यांना झालेल्या कथित धक्काबुक्की प्रकरणी मंगळवारी आम आदमी पक्षाचे आमदार प्रकाश जरवाल यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आमदार जरवाल यांना आंबेडकर नगर येथील त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेत चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले. या अगोदर मुख्य सचिवांनी मुख्यमंत्री अरविंद के जरीवाल यांच्या निवासस्थानावर सत्ताधारी आपचे 2 आमदार अजय दत्त आणि प्रकाश जरवल यांच्यावर धक्काबुक्की केल्याचा आरोप केला होता. ही धक्काबुक्की आधार-संबंधित प्रश्‍नांवर चर्चेसाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीच्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या समक्ष झाल्याचा दावा मुख्य सचिवांनी केला आहे. या घटनेनंतर दिल्ली सरकारच्या प्रशासकीय अधिकार्‍यांनी मुख्य सचिवांवरील कथित हल्ल्याच्या विरोधात मेणबत्ती मोर्चा काढला.आमदार जरवल यांनी मुख्य सचिव अंशु प्रकाश यांच्याविरुद्ध एससी,एसटी आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. यात मुख्य सचिवांनी परिसरातील मूलभूत सोयीसुविधा पुरवणे त्यांची जबाबदारी नसल्याचे म्हटल्याचा दावा करण्यात आला आहे. मुख्य सचिव प्रकाश यांनी जातीयवादी टिपण्णी केल्याने त्यांच्याविरोधात एससी, एसटी आयोगाकडे तक्रार नों दवल्याची माहिती जरवल यांनी यावेळी दिली. जरवल दिल्ली विधानसभेतील देओली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.