Breaking News

महाविद्यालयाचा जगभर लौकीक करू ः भाऊ कर्‍हाडे

जीवनात काही मिळवायचे असेल तर प्रचंड संघर्ष करावा लागतो. शेतकरी आहे म्हणून जिद्द ही जन्मतः अंगात भिनली होती. अपयशाने खचून न जाता जिद्दीने उभे राहा, कोणतीही गोष्ट अशक्य नाही असे प्रतिपादन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व दिग्दर्शक भाऊराव कर्‍हाडे यांनी केले. न्यू आर्टस् महाविद्यालय येथे आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. 


शहरातील न्यू आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी वर्षभर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले. पारितोषिक वितरणच्या अध्यक्षस्थानी नंदकुमार झावरे होते, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती म्हणून असलेले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी दिग्दर्शक भाऊराव कर्‍हाडे यांनी विद्यार्थ्यांशी मुक्तपणे संवाद साधला. यावेळी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील गमतीशीर किस्से त्यांनी सांगितले. कॉलेज ते आजपर्यंतचा प्रवासाचा उलगडा त्यांनी केला. शेतकरी आहे यामुळे जिद्दही अंगात असणार व जिद्दीच्या जोरावर आज मी यश मिळविले आहे. आज ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन यशाच्या शिखरावर पोहचलो आहे, त्या कॉलेजचे नाव जगात सर्वत्र पोहचविणे माझे ध्येय आहे. कार्यक्रमाप्रसंगी रामचंद्र दरे, दीपलक्ष्मी म्हसे, नंदकुमार झावरे, प्राचार्य बी. एच. झावरे, सिनेट सदस्य बाळासाहेब सागडे आदींसह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.