Breaking News

प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला आरोग्य मेळावा संपन्न

दहिगावने / वार्ताहर । 25 ःऊर्जा, आनंद आणि स्फूर्ती अंगी असलेल्या महिला आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असतात. रोजची धावपळ कामाची काळजी यात महिला आपल्या शारिरीक व मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात त्यातून महिलांचे आरोग्य बिघडल्याने कुटुंबाची परवड होते. त्यासाठी महिलांनी अगोदर स्वताच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे आणि कौटुंबिक जबाबदारी असल्याने महिलेचे आरोग्य सुदरूड असले पाहिजे, कारण महिला संपुर्ण कुटुंबाचा कणा असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जि. प. उपाध्यक्षा राजश्री घुले यांनी केले. शेवगाव तालुक्यातील दहिगाव ने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला आरोग्य मेळावा आणि त्यानिमित्त हळदीकुंकू आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होत्या. 


जिल्हा आशा स्वयंसेविका समन्वयक संज्योत उपाध्ये, जिल्हा हिवताप निवारण अधिकारी रजणी खुणे, तालुका एकात्मिक बालविकास अधिकारी नांगरे, माजी पं. समिती सभापती आशा जाधव, दहिगाव-ने प्रथम नागरिक शोभा पवार, शोभा पाऊलबुद्धे, प्राध्यापीका उषा नरवडे, मंगल जाधव, सुनिता घोडके, शबाना शेख, निर्मला कानडे, रांजणी सरपंच मनिषा घुले उपसरपंच उषा पवार आदी महिला पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा स्वयंसेविका गावातील कुटुंबाची आईसमान काळजीपूर्वक काम करतात, त्याही तुटपुंज्या मानधनावर त्यांच्या मानधन वाढीसाठी आपण प्रयत्नशील असल्याचे घुले यांनी यावेळी आवर्जुन सांगितले. जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, प्रसुती योजना, कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया या योजना आरोग्य केंद्रात यशस्वीरीत्या राबविल्या राबविल्या जातात. तर आजच्या मेळाव्यात महिला हिमोग्लोबिन व रक्त शर्करा तपासणी प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. कैलास कानडे, व आरोग्य पथकाने राबवली. हळदीकुंकू कार्यक्रमात विविध प्रकारच्या सामाजिक, कौटुंबिक, राजकीय, विनोदी, पारंपारीक नव्या जुन्या पिढीतील सरमिसळ असलेल्या उखाणे स्पर्धा मध्ये महिलांनी उस्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाची रंगत वाढविली.