Breaking News

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘कोमा कॅफे’ची बाजी

पुणे, दि. 31, जानेवारी - अविनाश वासूलिखित आणि दिग्दर्शित ‘कोमा कॅफे’ या चित्रपटाने न्यूयॉर्क येथे नुकत्याच झालेल्या दक्षिण आशियाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांच्या पसंतीचा दुस-या क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून पुरस्कार पटकावला.


सत्यदीप मिश्रा, महेश मांजरेकर आणि आदिती वासुदेव या नामवंत कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. यापूर्वी ‘कान्स फेस्टिव्हल’मधील ’फिल्म मार्केट’ विभागात हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. जर्मनीमधील बर्लीन येथे झालेल्या ‘इन्डो जर्मन फिल्म वीक 2017’मध्येही तो दाखविण्यात आला आला असून त्यास प्रेक्षक आणि समीक्षकांची पसंती मिळाली आहे. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या दक्षिण आशियाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा समावेश करण्यात आला. ‘कोमा कॅफे’ ही नावीन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित वेगळ्या धाटणीची कलाकृती असून विव्हान नावाच्या तरूणाची ही कथा आहे.
अविनाश वासू हे पुण्यातील फ्लेम युनिव्हर्सिटी’चे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी नेहमीच नावीन्यपूर्ण आशय असलेल्या चित्रपटांची निर्मिती करण्यावर भर दिला. पदवीचे शिक्षण घेत असताना त्यांनी चित्रपट निर्मिती या विषयात सुवर्णपदक पटकावले आहे. महाविद्यालयीन काळात ‘रूबिक्स क्यूब मीडिया’ नावाची निर्मिती संस्था सुरू करून त्या माध्यमातून 30 पेक्षा अधिक चित्रपटांच्या निर्मितीत त्यांनी सहभाग घेतला. लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायांकन, निर्मिती अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप निर्माण केली आहे. त्यानंतर 2013 मध्ये मुंबईत स्थायिक होऊन त्यांनी ‘एरंगो मीडिया’ या निर्मिती संस्थेची स्थापना केली. 2014 मधील कान्स महोत्सवात त्यांनी बनविलेल्या ‘युअर डे अ ॅट कान्स’ या 15 सेंकदांच्या ध्वनीचित्रफितीने पुरस्कार पटकावला होता.