Breaking News

रिलायन्स फ्रेशने केली फळांची थेट खरेदी


सोलापूर - रिलायन्स फ्रेश कंपनीने जिल्ह्यातील करमाळा, सांगोला, पंढरपूर, माळशिरस व माढा तालुक्यातील शेतकर्‍यांकडून थेट शेतमाल खरेदी सुरू केली आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी गटशेतीला अधिक प्रोत्साहित करण्यासाठी ’आत्मा’तर्फे कार्यशाळा घेतली. तीत जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले होते. रिलायन्सच्या मागणीनुसार पाहिजे तेवढा व पाहिजे तसा शेतमाल देण्याचे मान्य करण्यात आले होते. 2017 मध्ये जिल्ह्यातून 85 टन सेंद्रिय डाळिंबाची खरेदी करण्यात आली. त्याचा दर होता प्रति किलो 105 रुपये. याच काळात बाजारात 30 ते 50 रुपयाने डाळिंब विक्री होत होती. कंदर व आदी भागातून 150 टन केळी खरेदी करण्यात आली. यंदा द्राक्ष, लिंबू व कांदा खरेदी करण्याचे नियोजन आहे.
रिलायन्स कंपनी सुरुवातीला करमाळा तालुक्यातील कंदर येथून केळी खरेदी करत होती. गेल्या दोन वर्षांपासून डाळिंब खरेदी केली जात आहे. यंदा प्रथमच द्राक्षांसाठी मागणी नोंदवली आहे. याशिवाय गटशेतीच्या माध्यमातून शेतमाल खरेदी करणार आहे. मागील दोन वर्षांत जिल्ह्यातील गटशेती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. यामुळे रिलायन्सने थेट गटाकडे मागणी नोंदवली आहे.रिलायन्स फ्रेशकडून शेतकर्‍याकडे मागणी नोंदवली जाते. मालाचा दर्जा व गुणवत्ता पाहून दर ठरवला जातो. शेतातून माल खरेदी केल्याने शेतकर्‍यांना वाहतूक, आडत याचा खर्च होत नाही. यामुळे शेतकर्‍यांना बाजार दरापेक्षा अधिक नफा मिळतो.