Breaking News

बार्शी तालुक्यात खाते क्रमांकाअभावी 4 कोटी पडून

सोलापूर - बार्शी तालुक्यात शेतक-यांच्या बँक खाते क्रमांकाअभावी दुष्काळ अनुदानाची सुमारे चार कोटी रक्कम पडून आहे. शासनाने सन 2015-16 च्या रब्बी हंगामातील पीक विमा न घेतलेल्या शेतकरी खातेदार यांना अनुदान देण्याचे जाहीर केले असून त्याकरिता बार्शी तालुक्यातील एकूण 66654 खातेदार यांचे 75769.43 हेक्टर क्षेत्रासाठी 11 कोटी 97 लाख 34 हजार 342 एवढे अनुदान प्राप्त झालेले आहे. यापैकी 12 जानेवारी 2018 अखेर 42246 खातेदार यांचे 49995.36 हेक्टरसाठी रक्कम रुपये 7 कोटी 97 लाख 94 हजार 113 शेतकरी खातेदार यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी बँकेकडे धनादेशद्वारे देण्यात आलेले आहे.आणखी 24131 खातेदार यांचे 25774.07 हेक्टर क्षेत्रासाठी 3 कोटी 99 लाख 56 हजार 679 रुपये एवढी रक्कम पात्र शेतकरी खातेदार यांचे बँक खाते क्रमांक उपलब्ध नसल्याने खात्यावर जमा करणे बाकी आहे.24408 खातेदारांनी अद्याप आपल्या बँक खाते क्रमांकाची माहिती तलाठी यांच्याकडे दिलेली नाही. ज्या शेतकर्यांचे बँक खाते क्रमांक मिळालेले नाहीत, अशा शेतक-यांची यादी संबंधित गावचे तलाठी यांनी त्यांचे चावडीचे नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. (जरी कुठे प्रसिद्ध झाली नसेल तर कृपया तलाठी यांच्याकडे संपर्क साधा.) तरी देखील अद्याप बँक खाते क्रमांक मिळालेले नाहीत. संबंधित पात्र शेतकरी खातेदारांनी लवकरात लवकर आपले बँक पासबुकची छायांकित प्रत आपल्या गावचे तलाठी यांच्याकडे जमा करावी, असे आवाहन केले आहे.