देशावर अधिराज्य गाजवणाऱ्या काँग्रेसचे अवघ्या चार राज्यांमध्ये अस्तित्व उरले !
गुजरातमधील सत्ता राखण्यासोबतच भाजपने हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या पंजाकडून हिसकावून घेतल्याने आता देशात भाजपची एकहाती अथवा मित्रपक्षांच्या मदतीने सत्ता असणाऱ्या राज्यांची संख्या १९पर्यंत पोहचली आहे. तर एकेकाळी संपूर्ण देशावर अधिराज्य गाजवणाऱ्या काँग्रेसचे अवघ्या चार राज्यांमध्ये अस्तित्व उरले आहे.
यामध्ये पंजाब, कर्नाटक ही दोन मोठी राज्ये वगळता ईशान्य भारतातील मिझोरम आणि मेघालय या दोन छोट्या राज्यांचा समावेश आहे. पंजाबमध्ये नुकतीच निवडणूक पार पडली असून, उर्वरित तीनही राज्यांमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. कर्नाटकात पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी भाजपने दोन वर्षे आधीपासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
तर ईशान्य भारतात स्थानिक पक्षांची मोट बांधून सत्ता खेचून आणण्याची मोदी-शाह जोडीची व्यूहरचना आहे. यानंतर २०१९मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी राजस्थान, मध्यप्रदेश या भाजपशासित राज्यांची विधानसभा निवडणूक होणार आहे