Breaking News

ऐतिहासिक बारवेच्या दगडांचा अखेर पंचनामा दै. लोकमंथनचा पाठपुरावा; तक्रारदाराचा पंचनाम्यावर आक्षेप

कुळधरण / प्रतिनिधी । 22 :- कुळधरण येथील सार्वजनिक विहीर खोलीकरण व रुंदीकरण काम करताना निघालेल्या ऐतिहासिक शिळा व दगड विकून अपाहार केल्याच्या तक्रारीची प्रशासनामार्फत दखल घेत त्याचा पंचनामा करण्यात आला.


कर्जत तालुक्यातील कुळधरण ग्रामपंचायतच्या वतीने एप्रिल 2016 ते मार्च 2017 या कालावधीत 14 वा वित्त आयोग निधीतून सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यात आले होते. कुळधरणच्या जगदंबा मंदिरामागील जुन्या, ऐतिहासिक बारवेचे रुंदीकरण व खोलीकरण काम करण्यात आले. मात्र हे काम करत असताना निघालेल्या आखीव रेखीव नक्षीकाम असलेल्या शिळा व दगड विकून अफरातफर केल्याची तक्रार कुळधरण ग्रामविकास संघटनेचे सुधीर जगताप यांनी शासनाकडे केली होती. बारवेच्या बांधकामात मौल्यवान शिळा वापरण्यात आलेल्या होत्या. 30 ते 35 फुट खोलीचे बांधकाम कोरीव दगडाने बांधलेले होते. परंतु बारवेचे खोलीकरण व रुंदीकरण काम करताना हे बांधकाम उचकटुन आणण्यात आले. बाहेर काढलेल्या सर्व शिळा व दगड ग्रामपंचायतीने परस्पर विकून त्यामध्ये सुमारे 40000 ते 50000 रुपयांचा अपहार केला अशी तक्रार जगताप यांनी शासनाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने बारवेचे दगड, शिळा टाकलेल्या ठिकाणाचा पंचनामा केला. पंचनाम्यात बारवेच्या जवळच बंधार्‍यात दगड व माती पडून आहे व काही दगड मातीत गाडलेले आहेत असे पंचनाम्यात म्हटले आहे.पंचनाम्यावर देविदास भवाळ, रणजीत भोस, निलेश सुपेकर, दादा गुंड, यशवंत होळकर, रामेश्‍वर काळे आदींच्या सह्या आहेत. मात्र सुधीर जगताप यांनी पंचनाम्यावर आक्षेप घेतला आहे. या प्रश्‍नी दै. लोकमंथननेही सचित्र वृत्त प्रसिद्ध करुन हा प्रकार उजेडात आणला होता.

दर ठिकाणचा पंचनामा माझ्या समक्ष करावा अशी मागणी तक्रारीतुन केली होती. मात्र ग्रामपंचायतीने पुन्हा अधिकार्‍यांबरोबर तडजोड करुन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला आहे. केलेला पंचनामा मान्य नसुन मी पुन्हा वरिष्ठांकडे तक्रार करणार आहे. मर्जीतील लोक बोलावुन सोयीस्कर पंचनामा केलेला आहे. ग्रामविकास अधिकार्‍याने गावाच्या राजकारणात पडु नये. ग्रामपंचायत सदस्य शेषेराव सुपेकर व वर्षा सुपेकर या सदस्यांनी माझ्या तक्रारीला पाठिंबा दिला असुन अफरातफरीचा पाठपुरावा सुरुच ठेवणार आहे.