Breaking News

पाडळी परिसरात चोरटयांची दहशत ; नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पोलिसांचे दुर्लक्ष

जामखेड / ता. प्रतिनिधी । 22 ः जामखेड तालुक्यातील पाडळी परिसरात मागील आठवड्यापासून चोरटयांचा धुमाकूळ सुरू असुन या परिसरात चो-यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असुन या परिसरात चोरट्यांनी मोठी दहशत निर्माण केल्याने नागरिक भयभीत झाले असुन या चोरटयांचा बंदोबस्त त्वरीत करण्यात यावा. याबाबतचे निवेदन पाडळी गावच्या नागरिकांनी जामखेड पोलिसांना नुकतेच दिले असुन चोरटयांचा बंदोबस्त न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

पाडळी (ता.जामखेड) परिसरात गेली आठवडा भरापासून चोरटयांचा मोठा धुमाकूळ सुरू असुन या परिसरात चो-यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे, यामध्ये अनेक नागरिक जखमी झाले असून या परिसरात चोरट्यांनी मोठी दहशत निर्माण केल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. दि. 14 डिसेंबर रोजी मध्यरात्री शिवाजी अजिनाथ पवार यांच्या आईच्या कानातील फूले व नाकातील नथ चोरट्यांनी लंपास करून त्याच रात्री चोरटयांनी आपला मोर्चा राधाबाई किसन खैरे यांच्या घराकडे वळविला. राधाबाई यांच्या गळ्यातील दागिने चोरून त्यांना जबर मारहाण करून त्यांना जखमी करण्यात आले. या दोन्ही तक्रादारांनी आपापल्या तक्रारी जामखेड पोलिसांत दाखल केल्या आहेत. एक किंवा दोन दिवसाच्या फरकाने पुन्हा चोरटयांनी बापुराव रामभाऊ पवार यांच्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. 

यावेळी घरातील मंडळी जागी झाल्याने चोरटयांना रिकाम्या हाताने पळावे लागले. पुन्हा मध्यरात्री सोनबा पवार यांच्या घरावर चोरट्यांनी हल्ला चढविला. मात्र गावक-यांच्या जागृतीमुळे तो अयशस्वी ठरला. एका पाठोपाठ घडलेल्या घटनांमुळे गावात सध्या भितीचे वातावरण पसरले असुन गावकरी रात्र जागून काढत आहेत. रात्री पुरुष मंडळी शेतात दारे धरण्यासाठी जातात. यावेळी महिला व लहान मुले एकटेच घरी असतात. यामुळे परिसरात मोठे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असुन ती बंद करण्यात यावी, तसेच या परिसरातील चोरटयांचा बंदोबस्त त्वरीत करण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांनी जामखेड पोलिसांना दिलेल्या निवेदनात केली असून या चोरटयांचा बंदोबस्त न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर सरपंच शोभा खैरे उपसरपंच रमेश पवार ग्रा. स. राजेंद्र पवार, सुनिल पवार, दत्ता पवार, शांतीलाल खैरे, गौतम शिंदे, बाळासाहेब खैरे, शिवाजी पवार, सुखदेव पवार यांच्यासह इतर नागरिकांच्या सह्या आहेत.