शाळा बंद करण्याचा निर्णय दुर्देवी आणि बेकायदेशीर : आ. थोरात.
संगमनेर प्रतिनिधी - अडचणीच्या काळात सरकारने आईच्या भूमिकेतून शेतकरी व जनतेच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. मात्र तसे होत नाही. सध्या कापसाला बोंडआळीचा वाढता प्रार्दुभाव, ऊस प्रश्नांबाबत सरकारचे गोंधळाचे धोरण यांसह राज्यात पहिल्या टप्प्यातील १ हजार ३१४ शाळा बंद करण्याचा निर्णय हा घटनेविरोधी, दुर्देवी व बेकायदेशीर आहे, अशी टीका काँग्रेसनेते, माजी कृषी व शिक्षणमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केली.
कापूस प्रश्नावर ते म्हणाले कि, विदर्भात बोंडअळीचा प्रार्दुभाव खूप वाढला आहे. खरे तर बिटी उत्पादनात सातत्याने संशोधन होणे गरजेचे आहे. यासाठी सरकारच्या कृषी विभाग व कृषी विद्यापीठ यांनी सतत शेतकर्यांशी संवाद साधला पाहिजे. आपल्या कृषी मंत्री पदाच्या काळात विभागवार खरीप आढावा बैठका घेवून उत्पादनावर विविध बियाणे, धान्यांच्या जाती याबाबत चर्चा केली जाई, मात्र सध्या ते बंद होणे वाईट आहे. ऊस दराबाबत सरकारची ठोस भूमिका महत्वाची आहे. यासाठी राज्य व केंद्र सरकारने अनुदान दिले पाहिजे. ग्राहकांना साखर स्वस्त द्यावी. मात्र ऊस उत्पादक शेतकर्यांनाही लाभ मिळाला पाहिजे.
यासाठी काही प्रमाणात अनुदान दिले पाहिजे. अन्यथा ऊसाला एफआरपी देणेही कारखान्यांना अवघड होणार आहे. कर्जमाफीची घोषणा झाली. पण यावर शेतकर्यांचा विश्वास नाही. कर्जमाफीबाबत अजूनही संभ्रम आहे. एकूण सरकारच्या कोणत्याही क्षेत्रात अभ्यासपुर्ण नियोजन नाही. कोणतेही ठोस काम नाही. मागील ३ वर्षाच्या काळात एकही नवीन विकास काम दिसत नाही. फक्त जाहीराती आणि घोषणा आहे. त्यामुळे भाजपा सरकारच्या ‘अच्छे दिन’चे स्वप्न हवेत विरले. काँग्रेसने श्रीमती सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने व देशाच्या जनतेच्या विकासाचे कामे केली. खा. राहूल गांधी यांनी पुन्हा पक्षात नवचैतन्य निर्माण केले असून गुजरातमध्येही काँग्रेस सरकारच सत्तेवर येणार आहे. महाराष्ट्रात पुढील सरकार हे काँग्रेसचेच असणार आहे, असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
