लातूर कृ.उ.बा.स.च्या वतीने शेतक-यांसाठी अत्यल्प दरातील भोजनगृह
लातूर, दि. 05, नोव्हेंबर - लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतक-यांसाठी अत्यल्प दरातील भोजनगृह उभारले जाणार आहे. या भोजन कक्ष उभारणीच्या कामाचा शुभारंभ ॠग’ समितीचे सभापती ललितभाई शहा यांच्या हस्ते करण्यात आला. लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. त्यामुळे माल खरेदी व विक्री करण्यासाठी येथे लातूरसह शेजारील नांदेड, बीड, उस्मानाबाद, सोलापूर आणि बिदर जिल्हयातील शेतकरी व व्यापा-यांची ये-जा असते. माल विक्री करण्यासाठी शेतकरी मोठया संख्येने बाजार समितीच्या परिसरात येतात. या शेतक-यांना बराच काळ थांबावे लागते त्यावेळी जेवणासाठी त्यांचा मोठा खर्च होतो. हा खर्च कमी व्हावा आणि शेतक -यांना परवडणा-या दरात पोटभर जेवण मिळावे यासाठी बाजार समितीने हा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. असा उपक्रम राबविणारी लातूर बाजार समिती मराठवाडयातील एकमेव आहे.