Breaking News

पोलिसांच्या आहारभत्त्यात घसघशीत वाढीचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

मुंबई, दि. 04, नोव्हेंबर - पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या आहारभत्त्यात घसघशीत वाढ करण्यात आली असून आधीच्या तुलनेत भत्त्याची रक्कम जवळपास दुप्पटीने वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. अधिकारी-कर्मचार्‍यांना हा वाढीव लाभ 1 डिसेंबर 2017 पासून मिळणार आहे.
राज्यातील पोलीस दलाला सक्षम करतानाच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पोलिसांचे वेतन आणि भत्त्यांमध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया विविध पातळ्यांवर सुरू आहे. पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांना कर्तव्यानिमित्त त्यांचे राहते घर आणि पोलीस ठाणे यापासून दूर रहावे लागते. अशावेळी त्यांना उत्तम आहार घेता येण्यासाठी आहारभत्ता देण्यात येतो.पोलिसांसमोरील वाढलेली आव्हाने आणि आहारांच्या किंमतीत झालेल्या वाढीचा विचार करता त्यांच्या आहारभत्त्यात वाढ करणे गरजेचे होते. त्यांना मिळणार्‍या आहारभत्त्यात 2011 पासून कोणतीही वाढ झाली नव्हती. पोलिसांचे आरोग्य व मनोधैर्य उत्तम ठेवण्यासाठी त्यांना चांगला व सकस आहार मिळणे आवश्यक असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी भत्तावाढीचा निर्णय घेतला. यात पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, फोटोग्राफर यांना मिळणारा 840 रुपयांचा आहार भत्ता आता 1500 रुपये तसेच पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस शिपाई (सशस्त्र व नि:शस्त्र) यांना मिळणारा 700 रुपयांचा भत्ता आता 1350 रुपये इतका करण्यात आला आहे.