Breaking News

विदर्भातील 7 सिंचन प्रकल्प 3 वर्षात पूर्ण होणार - अविनाश सुर्वे

नागपूर, दि. 04, नोव्हेंबर - नागपूर व अमरावती विभागातील मुख्यमंत्री यांच्या वाररुममध्ये प्राधान्यक्रम असलेल्या गोसीखुर्दसह निम्म वर्धा, बेंबळा, खडकपूर्ण, निम्म पेडी आदी सात प्रकल्पांची कामे येत्या तीन वर्षात पूर्ण होणार असून त्यासाठी प्रकल्पनिहाय निधीचे नियोजन करण्यात आल्याची माहिती विदर्भ सिंचन महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांनी आज,शुक्रवारी नागपुरात दिली.
माध्यम संवाद या कार्यक्रमात बोलताना सुर्वे म्हणाले की, महामंडळामार्फत 788 प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून 314 सिंचन प्रकल्पांची कामे सुरु असून त्यापैकी 122 प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत. या प्रक्पांची अद्यावत किंमत 72 हजार 730 कोटी रुपये असून ऑगस्ट अखेरपर्यंत यावर 35 हजार 508 कोटी रुपये खर्च झाला आहे. या प्रकल्पामुळे 15 लाख 96 हजार 044 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार असून जून-2017 अखेरपर्यंत 5 लक्ष 11 हजार 630 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी प्राधान्य दिले असून त्यासाठी वाररुम तयार करुन प्रत्येक प्रकल्पांचा आढावा घेवून प्रकल्पाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे ठरविले आहे. विदर्भातील 19 प्रकल्प या वाररुम मध्ये घेण्यात आली त्यामध्ये बावनथडी मोठा प्रकल्प, डोंगरगाव मध्यम प्रकल्प डिसेंबर 2017 अखेर पूर्ण करण्यात येणार आहे. निम्म वर्धा प्रकल्पाकरिता दौलतपूर गावाचे पुनर्वसनासाठी विशेष पॅकेज मंजूर केले आहे. त्यामुळे 113.59 दलघमी पाणीसाठा वाढणार असून 12 हजार हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.