Breaking News

घुमा चित्रपटाचे प्रस्तुतीकर्ता डॉ.नितीन दिघेंविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल

अहमदनगर, दि. 14, ऑक्टोबर - घुमा या मराठी चित्रपटाचे चित्रीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर चित्रपट प्रदर्शनासाठी प्रसिध्दीच्या दृष्टीने आवश्यक असणार्या प्रमोशनल अॅक्टिव्हिटी साठी 50 लाखांचा करार करून शेवटच्या घटकेला चित्रपटाच्या वितरणासाठी पैसे खर्च करण्यास असमर्थता दाखवून फसवणुक केल्या प्रकरणी चित्रपटाचे निर्माते मदन आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार घुमा चित्रपटाचे प्रस्तुतीकर्ता डॉ.नितीन बबन दिघे (मूळ राहाणार पारनेर,हल्ली मुंबई) यांच्या विरूध्द तोफखाना पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील काही तरूणांनी एकत्र येऊन घुमा या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे.या चित्रपटाला राज्य शासनाचा प्रथम पदार्पणाचा निर्माता पुरस्कार,पुणे फेस्टिव्हल मध्ये बेस्ट ऑडियन्स चाईस पुरस्कार मिळाला आहे.चित्रपटाच्या चित्रीकरणाचे व अन्य दोष्टींचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रस्तुतकर्ता या नात्याने चित्रपट प्रदर्शित करणे,विविध माध्यमांमध्ये जाहिराती करणे,प्रमोशनल अ‍ॅक्टिव्हिटी करणे या कामासाठी प्रस्तुती कर्ता डॉ.नितीन बबन दिघे यांच्याशी 50 लाख रूपयांचा करार केला होता.प्रस्तुतीकर्ता या नात्याने दिघे यांनी मुंबईच्या पिकल इंटरनेट यांच्याशी करार करून त्यांना 25 हजार रूपये अ‍ॅडव्हान्स देखील दिला.दरम्यान नितीन दिघे यांनी स्वत:चा फायदा करून घेण्याच्या उद्देशाने घुमा चित्रपटाच्या नावाचा वापर करून नृत्य स्पर्धांचे आयोजन केले. त्यावेळी स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांकडून प्रत्येकी 300 ते 400 रूपये घेतले. तसेच विविध टीव्ही शो मध्ये उपस्थित राहून स्वत:ची प्रसिध्दी करून घेतली. घुमा चित्रपटाचे प्रस्तुतीकर्ता या नात्याने दिघे यांनी जाहिरातीकरिता टीव्ही चॅनेल व जनसंपर्क अधिकारी .यांना दिलेले धनादेश पैसे न मिळाल्याने परत आले. चित्रपटाच्या प्रसिध्दी करिता आवश्यक असणारा खर्च करण्यास डॉ.दिघे यांनी असमर्थता दाखविली व कराराचा भंग केला. कराराचा भंग केलेला असल्याने डॉ.नितीन दिघे यांचे नाव प्रोमो,चित्रपटाचे ट्रेलर व संपूर्ण चित्रपटातूनच डॉ.नितीन दिघे यांचे नाव कमी करण्यासाठी 4 ते 5 लाख रूपयांचा खर्च करावा लागला आहे.त्या संदर्भात भारतीय चित्रपट महामंडळाकडे तक्रार देखील करण्यात आली आहे. या प्रकरणी निर्माते मदन आढाव यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलीसांना गुन्हा दाखल केलेला आहे.