Breaking News

धोनी आणि बुमराची चलाखी

कानपूर, दि. 30, ऑक्टोबर - टीम इंडियाने कानपूर वन डेत न्यूझीलंडवर सहा धावांनी थरारक विजय मिळवला. भारताने या विजयासह तीन वन डे सामन्यांची मालिकाही 2-1 ने  जिंकली. टीम इंडियाचा वन डे सामन्यांमधला सलग सातवा मालिका विजय ठरला. भारताने दिलेलं 338 धावांचं आव्हान न्यूझीलंडने जवळपास पेललं होतं. मात्र गोलंदाज बुमरा आ णि महेंद्र सिंह धोनीच्या चलाखीने या सामन्याला कलाटणी दिली.
न्यझीलंडला विजयासाठी अखेरच्या 18 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज होती. मात्र बुमराच्या यॉर्करने कमाल केली आणि सामन्याचं चित्र बदललं. ग्रँडहोम स्ट्राईकवर असताना बुमराने  त्याला यार्कर चेंडू फेकला. हा चेंडू मिस होऊन धोनीच्या हातात गेला. दोन्हीही फलंदाज धाव घेण्यासाठी पळाले, मात्र ग्रँडहोम पुन्हा माघारी क्रीजमध्ये परतला. अशा परिस्थितीमध्ये  नॉन स्ट्राईकला असलेल्या टॉम लॅथमकडेही माघारी जाण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र तो क्रीजवर पोहोचू शकला नाही. संधी पाहताच धोनीने चलाखीने बुमराच्या हातात चेंडू फेकला  आणि बुमरानेही संधी न चुकवता थेट स्टम्पवर चेंडू फेकला. दमदार फॉर्मात असलेला लॅथम 65 धावांवर बाद झाला.