Breaking News

कस्टम हाफ मॅरेथॉन - 2017 : जनता आणि शासनातील संवाद दृढ करणारी मॅरेथॉन - जेटली

मुंबई, दि. 30, ऑक्टोबर - कस्टम हाफ मॅरेथॉन- 2017 ही जनता आणि शासन यांच्यातील संवाद दृढ करणारी मॅरेथॉन ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली  यांनी केले. बेलार्ड इस्टेट येथे सीमा शुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागातर्फे आयोजित पहिली कस्टम हाफ मॅरेथॉन 2017 च्या पुरस्कार वितरण सोहळ्यात श्री. जेटली  बोलत होते. श्री.जेटली म्हणाले, शासनाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा मुंबईचे स्पिरीट दाखविणारा आहे. सर्व वयोगटातील नागरिकांचा सहभाग  असल्यामुळे ही मॅरेथॉन एकता दर्शवणारी ठरून, ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा दृढ करणार्‍या उपक्रमांना समाजातील जागरुक नागरिक नेहमीच प्रतिसाद देतील अशी आशा  श्री.जेटली यांनी यावेळी व्यक्त केली.
शासनाची संवादाभिमुख प्रतिमा निर्माण करणारा उपक्रम - मुख्यमंत्री
मॅरेथॉन ही मुंबईकरांसाठी क्रीडा प्रकार नसून नित्याचाच भाग आहे कारण मुंबई हे सातत्याने धावणा-यांचे शहर म्हणून सर्वांना परिचित आहे. त्याचबरोबर कस्टम विभाग म्हटले की  तस्करी रोखणे अथवा कारवाई करणे हीच भूमिका नसून या मॅरेथॉनच्या माध्यमातून शासकीय विभागांची संवादाभिमुख प्रतिमा निर्माण होण्यास मदत झाली आहे. शासनाला देशातील  सर्वाधिक महसूल प्राप्त करुन देणारा मुंबईचा कस्टम विभाग आहे. या विभागाने राबविलेला कस्टम हाफ मॅरेथॉन 2017 हा लोकाभिमुख उपक्रम निश्‍चितच प्रशंसनीय आहे, असे मत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले.
महाराष्ट्र पर्यटन विभाग आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या ऐतिहासिक वास्तूंसाठी क्यूआर कोड या अभिनव संकल्पनेचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. या विभागाच्या माध्यमातून  आतापर्यंत मुंबईतील 50 ऐतिहासिक वास्तूंना क्यूआर कोड देण्यात आले आहेत. क्यूआर कोडच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वास्तूंची माहिती अभ्यासकांना तसेच  सामान्य नागरिकांना सहजगत्या मिळण्यास मदत होणार आहे. भविष्यात हा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर सांख्यिकी माहितीसह ऐतिहासिक वास्तूची माहिती व इतिहास दर्शविणारी  चित्रफित दिसावी जेणेकरून मुंबईला भेट देणा-या पर्यटनात वाढ होईल अशी अपेक्षाही श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली. कस्टम हाफ मॅरेथॉनमधील विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या  हस्ते पारितोषिक व पुरस्कार प्रदान करण्यात आले. कस्टम विभागाच्या नूतन इमारत परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.