Breaking News

12 लाखांची लाच स्वीकारतांना तीन अभियंते जाळ्यात

नाशिक, दि. 14, ऑक्टोबर - सार्वजनिक बांधकाम विभागाचे तीन अभियंते 12 लाखांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक युनिटने केलेल्या कारवाईत जाळ्यात अडकले. यात दोन लाखांचे नकली चलन आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईतील तिन्ही अभियंत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र सखाराम पवार (वय-34) (शासकीय कंत्राटदार रा. नाशिक), सहाय्यक अभियंता सचिन प्रतापराव पाटील (वय- 42) व शाखा अभियंता अजय शरद देशपांडे (वय 45) यांनी अनुक्रमे 6 लाख व 3-3 लाख रुपये लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती.
तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार असुन त्यांनी सा. बां. विभागाकडील रस्ता तयार करण्याचे काम त्यांनी केलेले आहे. सदर कामाचे अंतिम बिल मंजूर करुन देण्यासाठी या लाचेची मागणी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, आज सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास या तिन्ही अभियंत्यांना सापळा रचून शिताफीने लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी सापळा अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक प्रभाकर घाडगे व नाशिकमधील पथकाचा समावेश होता.