Breaking News

गणेशोत्सवातून मुंबईकडे परतणार्‍या मोटारीला एसटीची धडक, एक ठार, चार जखमी

रत्नागिरी, दि. 04, सप्टेंबर - गणेशोत्सव आटोपून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुंबईकडे निघालेल्या चाकरमान्यांच्या इनोव्हा मोटारीला एसटीने धडक दिल्याने एक जण  ठार, तर त्याच कुटुंबातील अन्य चौघे जण जखमी झाले. मुंबई-गोवा महामार्गावर असुर्डे (ता. चिपळूण) येथे काल (दि. 2 सप्टेंबर) रात्री पावणेबाराच्या सुमारास  झालेल्या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे पाच तास ठप्प झाली होती.
याबाबत सावर्डे (ता. चिपळूण) पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार संजय तुकाराम वळंजू (वय 35, रा. गिरगाव, मुंबई) आपल्या कुटुंबासहृ  गणेशोत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या गावी आले होते. काल सायंकाळी वळंजु कुटुंबीय पुन्हा मुंबईला जाण्यासाठी निघाले. असुर्डेबनेवाडी येथे आल्यानंतर  त्यांच्या इनोव्हा मोटारीचा (क्र. एमएच 15 बीए 8901) टायर पंक्चर झाला. पंक्चर काढण्यासाठी वळंजू यांनी आपली गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली होती.  दरम्यान, लांजा-मुंबई एसटी (क्र. एमएच 14 बीटी 2714) तेथे आली. या गाडीने इनोव्हाचे पंक्चर काढण्यासाठी रस्त्यावर आलेल्या संजय वळंजू आणि त्यांचा  भाऊ संदीप वळंजू या दोघांना जोरदार धडक दिली. लांजा आगारातील चालक प्रवीण प्रभाकर जुवेकर (वय 32) यांना हे दोघे जण दिसले नाहीत. त्यामुळे ही धडक  बसली. या अपघातात एसटीच्या समोरील बाजूचे आणि वळंजू यांच्या गाडीच्या मागील बाजूचे मोठे नुकसान झाले. संजय वळंजू जागीच ठार झाले. त्यांचे बंधू संदीप  यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यासह गायत्री वंळजू, स्वाती वळंजू, शर्विल वळंजू यांना अधिक उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल  करण्यात आले. गायत्री वळंजू यांनी या घटनेची माहिती पोलिस ठाण्यात दिल्यानंतर सावर्डे पोलिस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सौ. वळंजू यांच्या  तक्रारीनुसार एसटी चालक जुवेकर याला अटक करण्यात आली. अपघातानंतर मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. दोन्ही बाजूंना सुमारे पाच  किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली होती.