Breaking News

ग्रामरोजगार सेवकांच्या उपोषणाची सांगता

बुलडाणा, दि. 27, ऑगस्ट - आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून चिखली पंचायत समितीसमोर सुरु असलेल्या ग्रामरोजगार सेवकांनी पुकारलेल्या बेमुदत उपोषणाची काल दि. 25 ऑगस्ट रोजी गटविकास अधिकारी यांच्या लेखी आश्‍वासनाने व आ.राहुल बोंद्रे यांच्या उपस्थितीत सांगता करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेने संपूर्ण महाराष्ट्रभर विविध मागण्यांपूर्ण करण्यात याव्यात यासाठी राज्यभर बेमुदत उपोषण पुकारलेले होते. त्यानूसार चिखली तालुका शाखेतर्फे स्थानिक पंचायत समितीसमोर दि.23 ऑगष्ट 2017 पासून बेमुदत उपोषण पुकारण्यात आले होते. संघटनेतर्फे दि.17 /7/2017 रोजीचे परिपत्रक रद्द करण्यात यावे, ग्रामरोजगार सेवकांना अर्धवेळ ठरविणारा आदेश रद्द करण्यात यावा, तसेच मंत्री महोदयांनी दिलेल्या आश्‍वासनानूसार तत्काळ निर्णय देण्यात यावा, ग्रामरोजगार सेवकांना ग्रामपंचायत खात्यावरुन दिले जाणारे मानधन थेट रोजगार सेवकांच्या वैयक्तीक खात्यात जमा करण्यात यावे, राजस्थान राज्याच्या धर्तीवर ग्रामरोजगार सेवकांना दरमहा रुपये 10 हजार रुपयांचे वेतन देण्यात यावे, 2 मे 2011 चा रोहयो कायद्याशी व मार्गदर्शन सुचनांचा विसंगत शासननिर्णय रद्द करण्यात यावा, राजकीय सुडबुध्दीने किंवा ग्रामसभेत ठराव घेवून ग्रामरोजगार सेवकांना कामावरुन काढून टाकण्याचा चुकीच्या पध्दतीला आळा घालण्यात यावा, चिखली पंचायत समिती अंतर्गत असलेल्या ग्रामरोजगार सेवकांचे 11 महिन्याचे थकीत मानधन त्वरीत देण्यात यावे, ग्रामरोजगार सेवकांना जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांचे स्वाक्षरीने ओळखपत्र देण्यात यावे, ग्रामरोजगार सेवकांना प्रवासभत्ता, मिटींग भत्ता, जॉबकार्ड नुतणीकरण इत्यादी कामांचे थकीत मानधन त्वरीत अदा करण्यात यावे, प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ग्रामरोजगार कक्षाची निर्मीती करुन टेबल खुर्चीची, कपाट व आवश्यक साहित्य देण्याबाबत सुचना देण्यात या व इतर मागण्यांचे निवेदन सादर आले होते. या तीन दिवस चाललेल्या या उपोषण मंडपास तालुक्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार आदी मान्यवरांनी भेटी दिल्या होत्या.
सदर उपोषणाची दखल घेत स्थानिक आमदार राहुल बोंद्रे, चिखली पं.स. चे गटविकास अधिकारी सुर्यकांत भुजबळ, सहगटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी दि.25 ऑगष्ट रोजी उपोषण मंडपास भेट देवून उपोषणकर्त्यांचे व संघटनेची भूमिका व मागण्या जाणून घेतल्या. यावेळी संघटनेच्या पंचायत समिती स्तरावर असलेल्या मागण्या गटविकास अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी तत्काळ मान्य करुन तसे लेखी  पत्र देवून ग्रामपंचायत सचिव व संबंधितांना आदेशही दिलेत. तर उर्वरित मागण्यां ह्या शासनस्तरावरील असल्याने त्याचा पाठपूरावा करणार असल्याचे आमदार राहुल बोंद्रे यांनी ठामपणे सांगितले. तर पंचायत समिती चिखली अंतर्गत घेण्यात येणार्‍या मासिक सभेमध्ये ग्रामरोजगार सेवकांना सेवेत कायम स्वरुपी रुजू करण्यात यावे, ग्रामरोजगार सेवकांच्या खात्यातच त्यांचे मानधन अदा करण्यात यावे, ग्रामरोजगार सेवकांना योग्य ते मानधन नियमित देण्यात यावे या मुद्दयांचा ठराव घेवून त्याचा पाठपूरावा विधानसभेत करु असेही आमदार राहुल बोंद्रे यांनी ठामपणे सांगितले.  यावेळी तालुका संघटनेचे अध्यक्ष दिनकर मोरे, सचिव रंगनाथ सावळे, कोषाध्यक्ष शिवाजी चितळे, कोरकमेटी सदस्य वसंता जाधव, सदस्य नारायण सोळंकी, गजानन निळे, रंगनाथ परिहार, किशोर सुरडकर, बबन गवई आदी उपोषणकर्त्यांना आमदार राहुल बोंद्रे यांचेहस्ते शरबत देवून उपोषणाची यशस्वी सांगता करण्यात आली.