Breaking News

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पिंपरीत पोलिसांचे ’मॉक ड्रील’

पुणे, दि. 23, ऑगस्ट - गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असून गणेश मंडळाचे कार्यकर्ते उत्सवाच्या तयारीला लागले आहेत. आगामी  गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी यादृष्टीने पोलीस यंत्रणादेखील कामाला लागली आहे. पिंपरीतील नेहरुनगर येथे पोलिसांनी मॉकड्रील  करून गणेशोत्सवासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले.
यामध्ये पोलीस नियंत्रण कक्षातून कॉल आल्यानंतर घटनास्थळी जाऊन दंगलीवर नियंत्रण मिळवणे, जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवणे, आग लागली  असता अग्निशामक दलाला वेळेत पाचारण करणे, बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्यास बॉम्ब निकामी करणारी यंत्रणा पाचारण करून तेथील परिस्थितीवर  नियंत्रण मिळवणे अशा प्रकारचे सराव यावेळी करण्यात आले.
यामध्ये परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक आयुक्त राम मांडुरके तसेच पिंपरी पोलीस ठाण्याचे सात अधिकारी 120 पोलीस कर्मचारी  सहभागी झाले होते. यामध्ये गणेश उत्सवात कंट्रोल रुमवरून दंगलीचा कॉल आल्यानंतरच्या कारवाईचा पोलिसांनी यावेळी सराव केला. या मॉकड्रिलमुळे  नागरिकांमध्ये काही काळ अफवा पसरल्या. मात्र, पोलिसांनी नागरिकांना विश्‍वासात घेऊन हा सराव असल्याचे सांगितले.