Breaking News

50 हजारांची लाच घेताना मंडलाधिका-याला अटक

पुणे, दि. 24, ऑगस्ट - दौंड तालुक्यातील यवत येथील मंडलाधिकारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात सापडला आहे. हरकतीचा निकाल तक्रारदार शेतकर्‍याच्या  बाजूने देण्यासाठी व फेरफार उतार्‍यावर नोंद करण्यासाठी 50 हजारांची लाच घेताना मंडलाधिकार्‍याला पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने  मंडलाधिकारी कार्यालयात सापळा रचून रंगेहाथ पकडले.
दुर्गादास चंद्रकांत शेळकंदे, (वय 43 वर्षे रा. होली कॉम्प्लेक्स, फ्लॅट न.11 उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने  रंगेहाथ पकडलेल्या मंडलाधिकार्‍याचे नाव आहे.
या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, तक्रारदार शेतकर्‍याने खरेदी केलेल्या जागेच्या व्यवहारात समोरच्या व्यक्तीने केलेल्या तक्रारी अर्जावरून घेतलेल्या हरकतीचा  निकाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी व फेरफार उतार्‍यावर नोंद घेण्यासाठी तक्रारदाराकडे 1 लाख रुपयांची मागणी केली होती.
तक्रारदार शेतकर्‍याने पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पहिला हप्ता 50 हजार रुपये देण्याचे ठरले होते. आज  पहिला हप्ता 50 हजार रुपये तक्रारदार शेतकर्‍याकडून घेत असताना यवत येथील मंडलाधिकारी कार्यालयाचे मंडलाधिकारी दुर्गादास शेळकंदे यास लाचलुचपत  प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईत सहाय्यक पोलीस अधीक्षक अशोक शिर्के, राजेश गवळी, पोलीस हवालदार, कृष्णा कुर्हे, शिंदेकर यांनी  सहभाग घेतला होता. याबाबत मंडलाधिकारी दुर्गादास शेळकंदे याच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू होती.