Breaking News

भिगवण ठरले राज्यातील पहिले ‘गटारमुक्त’ गाव

पुणे, दि. 02 - गाव कितीही सुंदर असले तरीही त्यामध्ये सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी गटारांची निर्मिती केली जाते. तसेच बर्‍याचशा गावांमध्ये स्वच्छतेअभावी  दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले असते. पण, याला अपवाद ठरले ते पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील सोलापूर हायवेवरील बाजारपेठ म्हणून नव्याने विकसित झालेले भिगवण  गाव. हे महाराष्ट्रातील पहिलेच ‘गटार मुक्त’ गाव ठरले आहे.
भिगवण गाव पुण्यापासून शंभर किलोमीटर अंतरावर आहे. विशेष म्हणजे उजनी धरणाच्या बॅक वॉटरचा उत्तम किनारा या गावाला लाभला आहे. या गावात मोठ्या  प्रमाणात दुर्गंधी आणि अस्वच्छता होती. त्यामुळे येथील गावकर्‍यांना याचा त्रास होत होता. गावकर्‍यांना या त्रासातून मुक्त करण्यासाठी पुण्यातील ’रोटरी क्लब पुणे  युनिव्हर्सिटी’ने गावकर्‍यांशी संवाद साधून गटारमुक्त गाव आणि शोषयुक्त खड्डे तयार करण्याचा वसा हाती घेतला, टप्याटप्याने ही योजना सुरू केली.
या कामासाठी रोटरी क्लब पुणे युनिव्हर्सिटीने 30 लाख रुपये तर ग्रामपंचायतीने 20 लाख रुपये खर्च केले. 4-5 हजार लोकांची आवक-जावक असलेल्या गावाला  10 लाख लिटरचा पाणी पुरवठा होत होता. त्यातील आठ साडेआठ लाख लिटर पाणी वाहून जात होते. गावात फक्त एक-दोन वॉर्डात गटारे होती. बाकी सर्व  ठिकाणी पाणी मैदानात, रस्त्यावर, इमारतीच्या पार्किंगमध्ये जागोजागी तुंबलेले असायचे. गावात 1300 पेक्षा अधिक सुधारीत शोष खड्डे तयार केले आणि सर्व  सांड्पाणी त्यात जिरवण्यास सुरूवात केली. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी ग्रामपंचायतीच्या कामाचे विशेष कौतुक केले.
भिगवण रोटरी क्लब ग्रामपंचायतीच्यावतीने आयोजित जल साक्षरता कार्यक्रमामुळे गावात शोष खड्यांच्या कल्पनेनी मूळ धरले आणि हा उपक्रम यशस्वीरित्या  राबविण्यात आला. या उपक्रमामुळे गावातील दुर्गंधी, डासाचे साम्राज्य कमी झाले असून, आजारी पडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे येथील नागरिक आता  स्वच्छंदीपणे राहत आहेत. या उपक्रमाचे विशेषतः महिला वर्गांनी स्वागत केले.