इम्रान ख्वाजा यांची ‘आयसीसी’च्या उपाध्यक्षपदी नियुक्ती
दुबई, दि. 25 - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या उपाध्यक्षपदी प्रशासकीय क्षेत्रातील दांडगा अनुभव असलेले सिंगापूरचे इम्रान ख्वाजा यांची नियुक्ती करण्यात आली. परिषदेने नुकत्याच स्वीकारलेल्या नव्या संविधानानुसार परिषदेत उपाध्यक्ष हे नवे पद एकमताने ठरवण्यात आले असून या पदावर ख्वाजा यांची नियुक्ती झाली. अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या अनुपस्थितीत बैठकांचे अध्यक्षपद भूषवणे हे त्यांचे मुख्य काम असणार आहे. ख्वाजा हे परिषदेशी संलग्न देशांच्या गटांचे अध्यक्ष म्हणून काम पहात होते. तसेच, परिषदेसंदर्भात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ख्वाजा यांनी शशांक मनोहर यांना राजीनामा मागे घेण्याचा सल्ला देऊन दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी राजी केले होते.