Breaking News

मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी; वाहतुकीवर परिणाम

मुंबई, दि. 25 - मुंबई आणि उपनगरांसह राज्यात ठिकठिकाणी पावसाने रात्रीपासूनच दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे हवेत गारवा आला असून मुंबईकर काही  अंशी सुखावला आहे. पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली असली तरीही रविवार म्हणजेच सुटीचा वार असल्यामुळे त्याचा चाकरमान्यांवर फारसा परिणाम झालेला  नाही.
काल रात्री दक्षिण मुंबई आणि पश्‍चिम उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली. तसेच कल्याण, ठाणे, डोंबिवलीपासून ते अगदी डहाणू, वसई-विरारपर्यंत पावसाने झोकात  ‘एन्ट्री’ केली. नवी मुंबईसह पनवेल, म्हापे, रबाळे, ऐरोली या भागांतही रात्रभर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली. याशिवाय, राज्यात उत्तर  महाराष्ट्रात नाशिक, इगतपुरी भागात मुसळधार पाऊस सुरु असून यामुळे शेतीच्या कामांना वेग येणार आहे.
दरम्यान, पावसामुळे वाहतूक सेवेवर परिणाम झाला आहे. मालाड सब-वेमधे पाणी साचल्यामुळे तेथून एकाच दिशेने वाहतूक सुरू आहे. तर ठाण्यातील मानपाडा  परिसरात महापालिकेच्या कार्यालयाची भिंत कोसळून दोन गाड्यांचे नुकसान झाले आहे. तसेच, रेल्वेसेवेवरही परिणाम झाला असून तिन्ही मार्गावरील रेल्वेरूळांवर  पाणी साचले आहे आणि मध्य व हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.