Breaking News

शिर्डी येथील वीज उपकेंद्रासाठी शिंगवे येथील जमीन परिसरासाठी होणार 133 केव्ही वीज उपकेंद्र


मुंबई, दि. 09 - शिर्डी परिसरातील विजेची समस्या निकाली काढण्यासाठी या परिसरात उभारल्या जाणार्‍या नवीन 133 केव्ही वीज उपकेंद्रासाठी महसूल  प्रशासनांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या मालकीची शिंगवे येथील जागा देण्यास मान्यता देण्यात आली. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी  नुकतीच या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.
शिर्डी परिसरात नव्याने 132/33 केव्हीचे वीज उपकेंद्र उभारण्यासाठी महापारेषणच्या वतीने जागेचा शोध सुरू होता. महसूल प्रशासनांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य  शेती महामंडळांच्या मालकीची अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात शिंगवे शिवारात 5.79 हेक्टर जमीन आहे. यापैकी 2.975 हेक्टर जागा वीज उपकेंद्रासाठी  महापोरषणला देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या प्रस्तावास महसूल राज्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्याने वीज उपकेंद्र निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.
या जमिनीसाठी चालू बाजारभावाने मूल्यांकन आकारून महापारेषणला वीज उपकेंद्रासाठी ही जागा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या प्रस्तावातील जमिनीच्या  हस्तांतरणाद्वारे प्राप्त झालेल्या रकमेचा विनियोग महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ शासनाच्या कर्जाची परतफेड करण्याकरिता करील, या अटीवर या प्रस्तावास मान्यता  देण्यात आली.