Breaking News

मुस्लीम मतदार एमआयएम पासून पुन्हा काँग्रेसकडे वळला ?

मुंबई, दि. 27 - राज्यातील मुस्लीम मतदार एमआयएम पासून पुन्हा काँग्रेसकडे वळू लागल्याचे चित्र भिवंडी , मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत दिसून आले आहे  . भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे. 
भिवंडी , मालेगाव या मुस्लिम बहुल मतदार संघात काँग्रेसचे पारंपरिक वर्चस्व होते . गेल्या काही वर्षात समाजवादी पक्ष आणि अलीकडे हैदराबादचा ओवेसी बंधूंचा  एमआयएम या पक्षांनी काँग्रेसच्या मतपेढीला खिंडार पाडले होते. एमआयएम ने 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले होते . त्याचा  फटका काँग्रेस उमेदवारांना अनेक ठिकाणी बसला . एम आय एम ला भारतीय जनता पक्षाची फूस असल्याचा आरोप केला गेला होता. ओवैसी बंधूंचा आक्रमक प्रचार  मुस्लिम युवकांना चांगलाच भावला असल्याचे दिसत होते. त्यामुळे एमआयएम ने विधानसभा निवडणुकीत 2 जागा जिंकल्या होत्या . आता मात्र मुस्लिम मतदार  एमआयएम पासून पुन्हा काँग्रेस कडे परंतु लागला आहे असे समजले जात आहे.
भारतीय जनता पक्षाने तिहेरी तलाक रद्द करण्यासाठी पावले टाकणे चालू केले आहे .कट्टर मुस्लीम धर्मीयांमध्ये त्यामुळे मोठी अस्वस्थता आहे . त्याच बरोबर गो  रक्षकांकडून राजस्थानमध्ये अलीकडे एका मुस्लिमाची हत्या केली गेली होती . या हत्येविरोधात आणि तिहेरी तलाक रद्द करण्यासाठी मोदी सरकारने टाकलेल्या  पावलांविरोधात मुस्लीम कट्टर पंथीयांनी जोरदार प्रचार चालू केला आहे . त्याचा फायदा काँग्रेसला झाल्याचे दिसते आहे. एमआयएम ला मत देणे म्हणजे भाजपचा  विजय सोपा करणे , असा जोरदार प्रचार मुस्लीम वस्त्यांमधून झाला. परिणामी या समाजातील अनेकांनी भाजपला रोखण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या पारड्यात आपली  मते टाकली . भिवंडी, मालेगाव मध्ये शिवसेना , भाजप ची युती झाली नव्हती . त्याचाही फायदा काँग्रेसला झाल्याचे बोलले जाते आहे. भिवंडीत मागच्या  निवडणुकीपेक्षा भाजपच्या जागा वाढल्या . मालेगावमध्ये भाजपने शून्यापासून 9 जागांवर मजल मारली आहे. भिवंडीत भाजपच्या दोन मुस्लीम महिला विजयी झाल्या  आहेत. याचा अर्थ भाजपने मुस्लिम मतदारांमध्ये हळूहळू स्थान निर्माण करण्यास प्रारंभ केला आहे.