शेतकरी आसूड यात्रेस प्रारंभ; शेतकरी जागृती सभा
अहमदनगर, दि. 14 - शेतकर्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा धरून हमीभाव द्यावा, अथवा सर्व शेतीमालावरील निर्यातबंदी कायमची उठवावी, शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत. या मागण्यांसह शेतमजूर, दिव्यांग सैनिक, शोषित व वंचित घटकांच्या जीवन मरणाच्या प्रश्नांवर रघुनाथ दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटना व आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटना यांनी संयुक्तपणे सी.एम.टू.पी.एम. आसूड यात्रा काढाली आहे.दि.11 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांच्या नागापूर गावातून निघालेल्या या यात्रेचा समारोप दि. 21 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगर (गुजरात) येथे होणार आहे. आसूड यात्रेचे दि. 17 व 18 एप्रिल रोजी नगर जिल्ह्यात आगमन होणार असून या निमित्त दि. 17 रोजी सायं. 5 वा. नगर येथे मार्केट यार्ड येथील शेतकरी सभागृहात तसेच दि. 18 रोजी सकाळी 9 वा. श्रीरामपूर येथील आझाद मैदान मेनरोड या ठिकाणी शेतकरी जागृती सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या प्रसंगी आमदार बच्चू कडू व रघुनाथदादा पाटील शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहेत.