Breaking News

महाराष्ट्रात उष्णतेचा प्रकोप वाढणार

पुणे, दि. 14 - भिरा (जि. रायगड) येथे सूर्याचा प्रकोप सुरूच असून या ठिकाणी सातत्याने राज्यातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद होत आहे. दोन आठवड्यांपूर्वी देशातील सर्वोच्च तापमान नोंदल्या गेलेल्या भिरामध्ये गुरुवारी राज्यातील सर्वोच्च 44.5 अंश सेल्सियस तापमान होते. महाराष्ट्रातील उष्णतेची लाट पुढचे तीन-चार दिवस कायम राहण्याचा अंदाज वेधशाळेने दिला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. तर गुजरातमधल्या सौराष्ट्र, कच्छ व पश्‍चिम राजस्थानातही उष्णतेची लाट आली आहे. गुजरातेतल्या सुरेंद्रनगर येथे देशातील सर्वोच्च 45 अंश तापमान होते. गेल्या 24 तासांत केरळ व तामिळनाडूत काही ठिकाणी वादळी पाऊस झाला. अंदमान व निकोबार बेटांवरही दोन दिवसांंत पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातील हवामानावर याचा परिणाम होण्याची चिन्हे नाहीत. राजस्थान, सौराष्ट्र व कच्छमधल्या अनेक गावांतील पारा 44 अंशांच्या पुढे आहे.