आयपीएलची नशा...!
दि. 08, एप्रिल - आयपीएलचे सामने सुरू झाले, आणि पुन्हा एकदा अनेक प्रश्न समोर येण्यास सुरूवात झाली. क्रिकेटचे होणारे बाजारीकरण, आणि पुन्हा पैश्यांचा नंगानाच यानिमित्ताने समोर येत आहे. क्रिकेट हा आता खेळ राहिला नाही, तो एक व्यवसाय झाला आहे. 2008मध्ये ’आयपीएल’ चा हा नंगानाच सुरु झाला. भारतातील अनेक नवोदित क्रिकेटपटूंना संधी देण्याच्या नावाखाली ’आयपीएल’ने जोर पकडला. यातून अनेक उदयोन्मुख खेळाडू समोर आले असले, तरी या एका बाबीबर आयपीएलचे समर्थन करता येणार नाही. मुळात आयपीएलचे समर्थन, अथवा टीका करण्याचा प्रश्न नसून, आयपीएलच्या पारदर्शकतेचा प्रश्न आहे. या स्पर्धांतून होणारी करोडो रूपयांची उलाढाल, ज्यावर नियंत्रण कुणाचे हाही महत्वाचा मुद्दा आहे. आयपीएलमध्ये क्रिकेटच्या नावाखाली ज्या पध्दतीने दोन-तीन महिने हैदोस घातला जातो. त्यात पुन्हा सट्टेबाजीमुळे तर आयपीएलची पुरती गोची झाली होती, आणि पुढेही होणार आहे. याच सट्टेबाजीतून सावरत अनेक संघाना डच्चू देत, अनेक क्रिकेटपटूंपर बंदी लादत, आयपीएलला देखाव्यापुरते स्वच्छ करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आयपीएलचे स्वरूप खरेच पारदर्शक आहेत का? हा महत्वाचा प्रश्न आहे. स्थानिक खेळाडूंना मोठी संधी व त्यापाठोपाठ आर्थिक मोबदलाही मिळतो. प्रत्यक्षात कित्येक जण अशा सट्टेबाजीसाठी खेळत असावेत, त्यांना मालक वा इतर घटकांकडून खेळविले जात असावे. एका डावात अनेक प्रकारचे डाव साधून घेणारा जुगाड आहे. आयपीएल म्हणजे सर्वच क्रिकेटप्रेमींना एक पर्वणी का वाटावी? प्रायोजकांकडून नि क्रिकेट मंडळाकडून भरपूर पैसा मिळत असल्यामुळे खेळाडु खूश, प्रक्षेपणाचे नि इतर हक्क विकून मिळणार्या पैशाने क्रिकेटमंडळे खूष, जाहिरातींचे भरपूर पैसे मिळत असल्याने वाहिन्या खूष, खर्च होत असलेला पैसा दामदुपटीने वसूल होत असल्याने प्रायोजक खूश असल्याचे चित्र आयपीएलमुळे दिसते. क्रिकेट हा नजाकतीने भरलेला नि हळुवारपणे खेळायचा खेळ आहे, धसमुसळेपणे खेळायला ती काही कुस्ती नव्हे. चेंडूवर दातओठ खात धावून जाणारे नि बॅट आडवीतिडवी फिरवून तो सटकवणारे हे खेळाडू फलंदाज आहेत की अन्य कुणी? असा प्रश्न पडतो. नजाकतीने मारलेला एक देखणा फटका पाहण्यासाठी मैदानावर अख्खा दिवस घालवणारे ते क्रिकेट्प्रेमी कुठे नि ह्या षटकात अजून एकही षटकार न बसल्यामुळे नाराज होणारे क्रिकेटप्रेमी कुठे? आयपीएल संघांचे मालक नि त्यांचे नखरे हे तर एक वेगळेच प्रकरण आहे. गुलामांना विकत घेत असल्यासारखी खेळाडू विकत घ्यायची ही पद्धत ज्याने शोधून काढली त्याच्या बुद्धीला खरोखरच सलाम केला पाहिजे. अर्थात, आपण दिलेले पैसे दामदुपटीने परत कसे मिळतील याची चिंता या संघमालकांना लागली असल्यामुळे त्यांच्या मनात या गुलामांपासून जास्तीत जास्त फायदा कसा घेता येईल याचेच विचार असतात. त्यातुन मग संघनिवडीमधे ढवळाढवळ करणे, संघाची व्युहरचना ठरवताना मधेमधे लुडबुड करणे, क्वचित अपयशी झाल्यास खेळाडूंना अपमानित करणे असे प्रकार होतात. आपले खेळाडू असे विकून नि त्यांना ह्या उद्योगपतींच्या मर्जीवर सोडून क्रिकेटमंडळ कसला आदर्श निर्माण करते आहे? एकूणच, आयपीएल ही क्रिकेट सामन्यांची मालिका असली तरी तिथे क्रिकेटपेक्षा चीअरगर्ल्सचा वाढता बीभत्सपणा, पुन्हा एकदा या आयपीएलला ओंगळवाण्याचे स्वरूप आणत आहे.