Breaking News

डोस्क फिरलया.. राजाचं डोस्क फिरलया!

दि. 15, एप्रिल - राजाची महत्वाकांक्षा क्रूर झाली की हतबल जनता एकतर राज्याचा त्याग करते,सामुहिक आत्मदहन करते किंवा राजाच्या क्रूरते विरूध्द बंड करून उठते.बंडात सहभागी होणारा प्रत्येक बंडखोर जगण्याचा हक्क मागत असला तरी त्या राज्याचा कायदा त्याला एकतर फितूर ठरवतो नाहीतर नक्षलवादी...
हा   इतिहास नाशिक जिल्ह्यात पुन्हा लिहीला जाण्याची भिती व्यक्त होऊ लागली आहे.निमित्त ठरणार आहे मुंबई -नागपूर या दोन राजधानीच्या शहराला जोडणारा समृध्दी महामार्ग.आणि क्रूर महत्वाकांक्षी राजा म्हणून इतिहासात नोंद होईल ती मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांची.
होय! हेच वास्तव आहे.हे भाकीत करतांना आमचं डोकं पुर्ण शाबुत आहे.परिस्थितीच भान आहे.डोक फिरलयं ते महाराष्ट्र शासनाचं,प्रशासकीय यंञणेचं आणि छञपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,राजश्री शाहु महाराज आणि डा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी सुजलाम सुफलाम महाराष्ट्रातील भुमीपुञाला उध्वस्त करून आपली महत्वाकांक्षा पुर्ण करू पाहणार्या मुख्यमंञ्यांचं.......
नागपुरहून मुंबईकडे जाणार्या वैदर्भीय आणि मराठवाडावासिय आमच्या बांधवांना सहज सुलभ प्रवास करता यावा ,वेळेची बचत व्हावी म्हणून ताशी दिडशे किमी वेगाने धावणारा महामार्ग बांधण्याची महत्वाकांक्षा पुर्ण करण्याच़ दिवा स्वप्न मुख्यमंञ्यांना पडलयं .विदर्भाचा आणि मराठवाड्याचा झपाट्याने विकास करण्याची घाई मुख्यमंञ्यांना झाली आहे,नाशिककरांच्या घरादारांवर बुलडोझर फिरवून,स्वतःची जमीन वाचवून आपल्या चिल्या पिल्यांच्या तोंडचा घास हिसकावला जाऊ नये म्हणून विरोध करणारा भुमीपुञ,बायका पोरं यांच्या प्रेताला तुडवून आपली महत्वाकांक्षा पुर्ण करण्याचा अट्टाहास देवेंद्र करीत आहेत.
हा प्रकल्प राजाच्या एकुणच विकासाच्या दृष्टीने पुरक ठरणार आहे.याविषयी शंका नाही .शंका आहे ती या मंडळींच्या हेतुविषयी.मराठवाडा आणि विदर्भ जेंव्हा जेंव्हा नैसर्गीक संकटात सापडतो त्या प्रत्येक वेळी नाशिक आणि शेजारचा अहमदनगर जिल्हा सर्वप्रथम मदतीला धावतो.संयुक्त महाराष्ट्र म्हणून नाशिक नगरकरांनी आपली जबाबदारी ओळखून पार पाडली आहे.मग यावेळी नाशिकचा भुमीपुञ एव्हढा आक्रमक होऊन समृध्दी महामार्गासारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला विरोध का करतो? याचा सरकारने आणि विशेषतः मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी सखोल अभ्यास करायला हवा.माञ शंभर टक्के प्रशासनावर विसंबून मुख्यमंञी भुमीपुञाच्या घरादारावर नांगर फिरवू पहात आहेत .समृध्दी महामार्गाने विदर्भ मराठवाडा समृध्द नक्कीच होईल पण त्याचवेळी नाशिक जिल्ह्यातील हजारो हेक्टरचे मालक असलेले शेकडो शेतकरी कुटुंब देशोधडीला लागतील हा विचार प्रशासनाच्या ओंजळीने पाणी पिणारे मुख्यमंञी कधी करणार? विदर्भाचा विकास व्हावा विकासाचा अनुशेष भरून निघावा अशी अखिल महाराष्ट्राप्रमाणे नाशिककरांचीही प्रामाणिक ईच्छा आहे.कळत नकळत त्याचा फायदा महाराष्ट्राला होणारच आहे.पण केंव्हा? तर या महाराष्ट्राची फाळणी झाली नाही तर..! आणि खरी मेख इथेच आहे.आज ना उद्या विदर्भाला वेगळं राज्य म्हणून दर्जा मिळणारच आहे.भाजपाचा तो अजेंडाच आहे.वेगळे राज्य म्हणून विदर्भाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता समृध्दी महामार्गासारखा हजारो कोटींचा प्रकल्प सहजासहजी पुर्ण होणे निदान पहिले दहा वर्ष तरी शक्य नाही.आणि म्हणूनच वैदर्भिय पुञ मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस संयुक्त महाराष्ट्राच्या तिजोरीवर समृध्दीचे तुळशीपञ ठेवून विकासाची पंगत देऊ पहात आहेत.
कुठलीही किंमत चुकवून मुख्यमंञ्यांना आपली ही महत्वाकांक्षा पुर्ण करण्याची घाई झाली आहे.या घाईचा अलगद फायदा   समृध्दी महामार्गाशी संबंधित असलेले प्रशासकीय अधिकारी विशेषतः सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंते आणि त्यांच्या सग्या सोयर्यांनी उचलला आहे.
समृध्दी महामार्गाचे होत असलेले सर्वेक्षण सुक्ष्मपणे अभ्यासल्यास वरच्या ओळीत केलेला दावा किती रास्त आहे हे लक्षात येईल.हा महामार्ग होणार याची कुणकुण लागल्यानंतर संबधित प्रशासकीय मंडळीने संभाव्य महामार्गालगत कवडीमोल भावात जमीनी खरेदी केल्या.जमीन व्यवहार घडवून आणणारा दलालही एका उच्चपदस्थ अभियंत्याचा मेव्हुणाच होता.आता प्रत्यक्ष मोजणी सुरू झाल्यानंतर शेतकर्याची जमीन तेव्हढी कशी संपादित करता येईल अशी शकूनी चाल प्रशासन करीत असल्याचे दिसत आहे.इगतपुरी तालुक्यात तर एका शेतकर्याची सर्व जमीन समृध्दीने खाल्ली.त्याच्या शेजारीच एका अधिकार्याची जमीन आहे.ती सर्वेत जाणीवपुर्वक वगळण्यात आली.एका शेतकर्याला देशोधडीला लावून स्वतः काही काळापुर्वी विकत घेतलेली जमीन वाचविणार्या प्रशासकीय अधिकार्यांविरूध्द असंतोष व्यक्त करणार्या बळीराजाला चिरडण्यासाठी पोलीस नावाचे दुसरे प्रशासन बंदूका ताणत आहे.
दुसर्याच्या हद्दीत विनापरवाना घुसणे भादंविनुसार फौजदारी गुन्हा आहे.शासकीय यंञणेलाही सवलत नाही.मग 27 मार्चला प्रशासन आबाजी झाडे नावाच्या शेतकर्याच्या शेतात कसे घुसते? परवानगी न घेता मोजणी करून कब्जा कसा मारते? हे सार अचानक घडतं म्हणून त्या भूमीपुञाला हृदयाचा झटका येतो त्यातच त्याचा अंत होतो...ही जबाबदारी समृध्दीची नाही का? मग संबंधित प्रशासनावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा का दाखल होत नाही...
आबाजी झाडे एकटेच समृध्दी बाधीत शेतकरी नाहीत.हा महत्वाकांक्षी प्रकल्प पुर्ण करण्यासाठी प्रशासन नाशिक जिल्ह्यातील अडीच हजार हेक्टर जमीन संपादित करून सदतीस किमीचा समृध्दी राजमार्ग ईगतपुरी,सिन्नर तालुक्याला छेदणारच या हट्टाला सरकार पेटले आहे.यापुर्वी घोटी नागपुर याचौतीस किमीच्या महामार्गासाठी जमीन अधिग्रहीत केली आहे.त्या जमीनी जैसे थे पडून आहेत,एव्हढच कशाला इगतपुरी तालुक्यातील एकुण 82 हजार हेक्टर पैकी छप्पन हजार हेक्टर जमीन लष्करा,वन,चौदा लहानमोठी धरणं एमआयडीसी, पेट्रोल लाईन,पवनऊर्जा ,अशा वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी सरकारने काढून घेतली आहे.आणि आता समृध्दीसाठी आणखी अडीच हजार हेक्टरसुपीक जमीन  अधिग्रहीत करून शेतकरी आणि त्यांचे कुटुंब समृध्दीच्या कडेला भीकेचं कटोर घेऊन उभ असल्याचं सरकारला पहायचे आहे.
समृध्दी बाधित शेतकर्यांनी माञ निर्धारा केलाय,जीव देऊ पण काळ्या आईचं राखण करु.. ही धमकी नाही तर स्वतःच्या बापजाद्यांची कष्टाची कमाई शाबुत ठेवण्याची धडपड आहे.लेकराबाळांच्या पंखात जगण्याची उमेद जागविणारी तळमळ आहे.तिचा अवमान झाला तर ईगतपुरी सिन्नर परिसरात गडचिरोलीची दाहकता निर्माण व्हायला वेळ लागणार नाही,हा ईशारा नाही तर शेतकर्यांच्या आर्त भावनांचा उमाळा आहे.