मनपा सर्वसाधारण सभेत पाण्यावरून राडा
औरंगाबाद, दि. 21 - महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत आज नगरसेवकांनी पाणीटंचाईवरून गोंधळ घालत महापौर बापू घडामोडे आणि आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना चांगलेच धारेवर धरले. शहरात पाणी अतिशय मोठ्या कालखंडानंतर येते आणि तेही अत्यंत कमी प्रमाणात येते त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी अत्यंत त्रास सहन करावा लागत असल्याचे या नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले. विशेषत: महिला नगरसेविका अधिक आक्रमक झाल्या होत्या. माधुरी अदवंत, अंकिता विधाते, संगीता वाघुले, मीना गायके यांनी तक्रारी केल्या. पाण्या बाबत अभियंता चहेल यांच्याकडे तक्रारी केल्या तर त्यावर काहीच कार्यवाही होत नाही अशाही तक्रारी यावेळी नगरसेवकांनी केल्या. राजू वैद्य, प्रमोद राठोड, राजू शिंदे, राजेंद्र जंजाळ, नंदकुमार घोडेले आदींनी यावेळी पाणीसमस्येबाबत गंभीरपणे विषय मांडला. गोंधळ वाढत चालला तेव्हा महापौर घडामोडे अस्वस्थ झाले आणि त्यांनी उठून गोंधळ न घालता विषय मांडण्याचे आवाहन केले. मात्र गोंधळ कमी होण्याऐवजी वाढत गेला तेव्हा सभा तहकूब करण्यात आली.