Breaking News

कर्जमाफीसाठी विरोधकांकडून सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

मुंबई, दि. 07 - शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक झालेल्या विरोधकांनी आज थेट सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. स्टेट बँक ऑफ इंडियाचं कार्यालय ते विधानभवनापर्यंत ही प्रेतयात्रा काढण्यात आली. या आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार सहभागी झाले होते.
दरम्यान आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सरकार आज शेवटच्या दिवशी काय घोषणा करतं, कोणता निर्णय घेतं, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. पण, विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकणारे विरोधक विधानभवनाच्या बाहेर मात्र चांगलेच आक्रमक झाल्याचं चित्र आहे. यावेळी अजित पवारांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करा. आम्ही परत कर्जमाफी मागणार नाही. आमचे शेतकरी धान्य, फळं, भाजीपाला घेतील, त्याला योग्य बाजारभाव द्या, आधारभूत किंमत द्या, असं अजित पवार म्हणाले.