Breaking News

इतर टेलिकॉम कंपन्यांविरोधात जिओची ’ट्राय’कडे तक्रार

मुंबई, दि. 14 - रिलायन्स जिओनं टेलिकॉम क्षेत्रात एंट्री केल्यानंतर इतर टेलिकॉम कंपन्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. आपल्याकडील ग्राहक कायम राखण्यासाठी टेलिकॉम कंपन्या अनेक नवनवीन ऑफरही लाँच करत आहे. पण आता जिओनं इतर टेलिकॉम कंपन्यांवर आरोप केला आहे.
आपल्या ग्राहकांना रोखण्यासाठी टेलिकॉम कंपन्या चुकीच्या पद्धती वापरत आहेत. असा आरोप रिलायन्स जिओनं केला आहे. जिओच्या मते, मोठ्या प्रमाणात ग्राहकांना या कंपन्यांच्या नेटवर्क नकोय. पण या कंपन्या ग्राहकांना तसं करु देत नाही. जिओनं भारती एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया सेल्यूलर यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे. याप्रकरणी जिओनं ट्रायला पत्र लिहून या कंपन्यांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
जिओचं म्हणणं आहे की, या कंपन्यांचं ग्राहकांशी असं वागणं हे लायसन्सच्या नियमांचं उल्लंघन आहे. जिओनं 10 एप्रिलला ट्रायला पत्र लिहलं आहे. यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, ‘नेटवर्क सोडून जाणार्‍या ग्राहकांना थांबवण्यासाठी विशेष पॅकेज आणि प्लान यासारखे अनेक मार्ग वापरण्यात येत आहेत.’ दरम्यान, याप्रकरणी व्होडाफोनचे प्रवक्त्यांनी सांगितलं की, ‘ग्राहकांच्या गरजेनुसार कंपनी आपले प्लान लाँच करते. आणि हे सारं काही नियमानुसार आहे.’ तर भारती एअरटेलच्या प्रवक्त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. कंपनी सर्व नियमांचं पालन करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.