Breaking News

’ईपीएफओ’च्या ’या’ कर्मचार्‍यांना 50 हजारांचा लॉयल्टी बोनस

नवी दिल्ली, दि. 14 - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओच्या दीर्घकालीन सभासदांसाठी खुशखबर आहे. 20 वर्ष किंवा त्यापेक्षा जुन्या खातेधारकांना घसघशीत लाभ होणार आहे. 20 वर्षे किंवा त्याहून जास्त कालावधीपासून पीएफ खातं असणार्‍या सभासदांना 50 हजार रुपयांचा लाभ होणार आहे. बांधिलकी रक्कम (लॉयल्टी बोनस) म्हणून खातेदाराला 50 हजार रुपये देण्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवण्यात आला आहे.
निवृत्तीच्या वेळी ही रक्कम खातेधारकांना मिळणार आहे. मूळ वेतन पाच हजार रुपयांपर्यंत असलेल्या कर्मचार्‍यांना 30 हजार रुपये, तर पाच हजार ते दहा हजार रुपयांदरम्यान मूळ वेतन असलेल्या कर्मचार्‍यांना 40 हजार रुपयांचा लाभ होईल. विशेष म्हणजे ईपीएफओ अंतर्गत विमा उतरवलेल्या खातेदारांचा खाते कालावधीतच मृत्यू झाल्यास अडीच लाखांची भरपाईही मिळणार आहे.
उमंग या अ‍ॅपद्वारे पीएफचे पैसे काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यामुळे 4 कोटी सदस्यांना फायदा होईल, अशी माहिती कामगार मंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी दिली होती. ईपीएफओला दररोज पीएफचे पैसे काढण्यासाठी, पेंशन संबंधीत किंवा पीडित कर्मचार्‍यांसंबंधीत इंशुरन्स काढण्यासाठी जवळपास 1 कोटी अर्ज येतात. या सर्व अर्जांचं काम कागदोपत्री केलं जातं. त्यामुळे ऑनलाईन प्रणालीमुळे नोकरदारांची मोठी समस्या कमी होणार आहे.