Breaking News

संत श्री ज्ञानेश्‍वर माऊलींचा 721 वा संजीवन समाधी सोहळा व जागतिक सहिष्णुता सप्ताहाचा समारोप

पुणे, दि. 28 - विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यामाने संत शिरोमणी श्री  ज्ञानेश्‍वर महाराज यांचा 721 वा संजीवन समाधी सोहळा व जागतिक सहिष्णुता सप्ताहाचा समारोप विश्‍वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे लाखो वारकर्यांच्या  उपस्थितीत पार पडला.
इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावरील लाखो वारकर्यांनी गुलाल, बुक्का व फुलांची ओंजळ वाहून ज्ञानेश्‍वर माऊलींचे भावपूर्ण स्मरण केले. भजन करून नामस्मरणाचा  गजर केला. यावेळी विश्‍वरुप दर्शन मंचावर घंटानाद करण्यात आला. विश्‍वशांती केद्राच्या वतीने लाखो वारकर्याना महाप्रसाद देण्यात आला.
तत्पूर्वी ह.भ.प.डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर यांनी काल्याचे कीर्तन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. याद्वारे शेकडो वर्षांची परंपरा  जपण्यात आली. इंद्रायणीच्या घाटावर लाखो वारकर्‍यांनी या समाधी सोहळ्याच्या काल्याच्या महाप्रसादाचा लाभ घेतला. हा उपक्रम या पुढेही चालू राहील.  समारंभासाठी विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे प्रमुख प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड,  गुणवंतराव दवंडे, उर्मिला कराड, ह.भ.प. नारायण महाराज  उत्तरेश्‍वर -पिंपरीकर, तुळशीराम कराड,  उषा कराड, श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीच्या मुख्य समन्वयक डॉ. सुनिल कराड, समन्वयक प्रा. स्वाती  कराड-चाटे, माईर्स एमआयटीच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड-नागरे व पंडित उध्दवबापू आपेगांवकर हे उपस्थित होते.
माऊलीच्या मंदिरातील गर्दीमुळे वारकर्‍यांना दर्शन घ्यायला अडचण होऊ नये म्हणून विश्‍वरूप दर्शन मंचावरून संजीवन समाधी सोहळ्याचे दर्शन लाखो  वारकर्‍यांना घडविण्यात आले. या सप्ताहात ह.भ.प.श्री. रामेश्‍वर शास्त्री, ह.भ.प. रामराव महाराज ढोक, ह.भ.प.श्री. किसनमहाराज साखरे व ह.भ.प. बाबामहाराज  सातारकर यासारख्या नामवंत कीर्तनकारांनी कीर्तनरूपी सेवा सादर केली. तसेच, पं. उपेंद्र भट, महेश काळे, पं. हेमंत पेंडसे व विश्‍वशांती संगीत कला  अकादमीच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी अभंगवाणी व भक्तीसंगीताचे कार्यक्रम सादर केले.
समाधी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या प्रवचनात ह.भ.प. बापूसाहेब मोरे म्हणाले, संत ही जगातील सर्वात मोठी शक्ती आहे. संतांची कृपा झाली तर आपल्याला  देवाकडे जाण्याचा मार्ग मोकळा होतो. संत आपल्यामधील दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून सत्प्रवृत्तीकडे घेऊन जातात. त्यामुळे संत हेच खरे तीर्थ आहे. ज्ञानेश्‍वर  माऊलींसारख्या संतांनी आपल्याला ज्ञानेश्‍वरी सारखा ग्रंथ उपलब्ध करून दिला. ज्ञानेश्‍वरीचा अभ्यास केल्यास ज्ञानेश्‍वर माऊलींची प्रत्यक्ष भेट होऊ शकते.
या सप्ताहात प्रवचन, कीर्तन, गायन व भजन या मार्गाने नामवंतांनी माऊलीचरणी आपली सेवा रूजू केली. यापुढेही वर्षभर लोकशिक्षणाचे विविध कार्यक्रम या  विश्‍वरूप दर्शन मंचावर आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामध्ये पर्यावरण स्वच्छता व निकोप, सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी जनजागृती याद्वारे विज्ञान व  अध्यात्म यांचा संगम होईल. पवित्र तीर्थक्षेत्रांचे खर्या अर्थाने ज्ञानतीर्थक्षेत्रामध्ये परिवर्तन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्व संतांनी दिलेला संदेश व त्यांची  शिकवण आत्मसात करून त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करावा, असे प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यावेळी म्हणाले.
या सर्व कार्यक्रमांचे संयोजन प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, ह.भ.प. किसन महाराज साखरे व डॉ. विजय भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुनील कराड  व   प्रा.स्वाती कराड-चाटे यांनी केले.