Breaking News

पाकिस्तानचे तपास पथक पठाणकोटमध्ये दाखल



नवी दिल्ली/प्रतिनिधी,दि.29 -  पठाणकोटमधील दहशतवादी हल्ल्याबाबत तपास करण्यासाठी भारतात दाखल झालेले पाकिस्तानचे संयुक्त पथक (जेआयटी) मंगळवारी सकाळी पठाणकोटमध्ये दाखल झाले. या पथकासाठी अमृतसरहून पठाणकोटला पोहचण्यासाठी बुलेटप्रुफ अलिशान मोटारींची व्यवस्था करण्यात आली होती.
पाकचे पथक पठाणकोटला भेट देणार असून, हवाई तळाच्या निवडक ठिकाणी जाण्यास या पथकाला परवानगी देण्यात आली आहे. तसेच ते काही प्रत्यक्षदर्शींशीही बोलणार आहेत. दरम्यानच्या काळात या पथकाला राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) हल्ल्याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. पाकिस्तानच्या तपास पथकाला भारतात येण्याची प्रथमच परवानगी मिळाली आहे. 2 जानेवारीला झालेल्या या हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा भारताचा दावा असून, तसे पुरावेही पाकिस्तानला देण्यात आले आहेत. ‘जॉईंट इन्व्हेस्टिगेशन टीम‘ (जेआयटी) असे या समितीचे नाव आहे. पंजाब दहशतवादविरोधी विभागाचे (सीटीडी) अतिरिक्त पोलिस

महासंचालक मुहम्मद ताहिर राय हे या समितीचे प्रमुख असतील. या समितीत दोन्ही बाजूच्या लष्करातील वरिष्ठ अधिकार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये लाहोर गुप्तचर विभागाचे उप महासंचालक मोहम्मद अझिम अर्शद, इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सचे (आयएसआय) लेफ्टनंट कर्नल तनविर अहमद, लष्करी गुप्तचर खात्याचे लेफ्टनंट कर्नल इरफान मिर्झा आणि सीटीडीचे तपास अधिकारी शाहीद तनवीर यांचा समावेश आहे.