Breaking News

ट्रस्टने घातली अनोखी सांगडः महापौर कळमकर

 अहमदनगर । प्रतिनिधी । 28 - शांतानंद महाराज ट्रस्टच्यावतीने वर्षभर अध्यात्मिक उपक्रम राबविण्यात येतच आहेत, त्याचबरोबर पर्यावरण जनजागृती, वृक्षसंवर्धन, स्वच्छता मोहिम या बाबतही समाजप्रबोधन करुन अध्यात्म व जनजागृतीची अनोखी सांगड ट्रस्टने घातली आहे. शांतानंद महाराजांचे कार्य अत्यंत महान होते.
 बलभिम डोके परिवाराच्यावतीने शांतानंद महाराजांचे कार्य अविरतपणे पुढे नेण्यात येत आहे. सर्वसामान्यांसाठी सतत काहीना काहीतरी करण्याची तळमळ डोके परिवाराची असते, असे प्रतिपादन महापौर अभिषेक कळमकर यांनी केले.एकनाथषष्ठीनिमित्त पारनेर तालुक्यातील रायतळे ते पैठण या प.पू.शांतानंद महाराज पायी दिंडीचे नगरमध्ये बाराबाभळी, भिंगार येथील उषादेवी बलभिम डोके विद्या मंदिर शाळेत नगरवासीयांच्यावतीने महापौर अभिषेक कळमकर यांनी दिंडीचे स्वागत करुन दिंडी चालक हभप महादेव महाराज काळे यांचा सत्कार केला. यावेळी वृक्षमित्र बलभिम डोके परिवाराच्यावतीने दिंडीची मुक्काम व भोजन व्यवस्था शाळेमध्ये करण्यात आली होती. याप्रसंगी माजी पोलिस अधिकारी एस.एम.खेडकर, एम. के. कदम, डॉ.गोपाळ पवळे, उल्हास तापकिर, राजेंद्र झोडगे, माणिक कावरे आदिंसह दिंडीतील 300 वारकरी उपस्थित होते. 
यावेळी बोलताना हभप काळे महाराज म्हणाले, 2000 साली शांतानंद महाराज समाधीस्त झाल्यानंतर एकनाथषष्ठीनिमित्त रायतळे ते पैठण पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. रायतळेच्या पंचक्रोशितून मोठ्या प्रमाणात वारकरी या दिंडी सोहळ्यात उत्स्फुर्तपणे सहभागी होत आहेत. दिंडीच्या प्रत्येक मुक्कामी स्थळी पर्यावरण जनजागृती, वृक्षसंवर्धन, स्वच्छता मोहिम बाबत जनजागृती करण्याचा उपक्रम प्रत्येकवर्षी राबवत आहोत, यासाठी संत जगद्गुरु तुकाराम व ज्ञानेश्‍वर माऊलींच्या ओव्यांचे दाखले देत आहोत. त्याचबरोबर दरवर्षी शांतानंद महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने उत्कृष्ट कन्या पुरस्कार, आदर्श सासू-सून पुरस्कार देण्यात येत असतो. यावर्षी आदर्श जावा-जावा पुरस्कार देण्यात येणार आहे.  कार्यक्रमाच्या प्रास्तविकात प.पू.सद्गुरु शांतानंद महाराजांच्या प्रेरणेने व आशिर्वादानाने दरवर्षी रायतळे ते पिंपळनेर व श्रीक्षेत्र पैठण पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते. भक्तीभावाने या दिंडीत वारकरी सहभागी होत आहेत. रणरणत्या उन्हातही ज्ञानोबा तुकाराम महाराजांचा नाम घेत सर्व वारकरी पैठणकडे मार्गस्त होत आहेत. महादेव महाराज काळे अत्यंत उत्कृष्टपणे दरवर्षी दिंडीचे नियोजन करत आहेत. महापौर  कळमकर यांच्या रुपाने नगर शहराला युवा नेतृत्व लाभले आहे. कळमकर कुटूंबालाही अध्यात्माची मोठी आवड आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक बाळू वायभासे यांनी केले तर आभार बी.एच.परदेशी यांनी मानले.