मल्यांची ‘किंगफिशर एअरलाईन्स’ बंद पडू नये म्हणून मुखर्जी यांची भेट घेतली होती- गडकरी
नागपूर, 26 - उद्योगपती विजय मल्या यांची ‘किंगफिशर एअरलाईन्स’ ही विमान कंपनी बंद पडू नये म्हणून आपण तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली होती, अशी माहिती भाजप नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे एका कार्यक्रमात दिली.
या भेटीचा उद्देश हा मल्यांची बाजू घेणे नव्हता तर कंपनी बंद पडल्यास बेरोजगार होणार्या कर्मचार्यांच्या भविष्याचा होता असेही त्यांनी स्पष्ट केले. आपण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना किंगफिशरच्या संदर्भात तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांना भेटलो होतो. ही कंपनी बंद पडू नये, अशी विनंती केली होती. यावर मुखर्जी यांनी ‘तुम्ही अशी विनंती का करता’ अशी विचारणाही केली होती. कंपनी बंद पडल्यास तेथे काम करणार्या कर्मचारी बेरोजगार होतील, असे आपण त्यांना सांगितले होते, असे गडकरी म्हणाले. कर्ज बुडविले म्हणून आज मल्यावर देशभर टीका केली जात आहे, मात्र याच मल्याने घेतलेल्या कर्जावरील व्याजामुळे बँका नफ्यात आल्या होत्या, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले. व्यवसायासाठी घेतलेले कर्ज थकले असेल तर कर्ज थकविणार्याला गुन्हेगार ठरविणे चुकीचे आहे. अशाचप्रकारे आपण नागपूरची एम्प्रेस मिल बंद पडू नये म्हणून रतन टाटांची भेट घेतली होती, असेही त्यांनी सांगितले. हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याने विजय मल्यांवर टीका होत आहे.