Breaking News

नेपाळ व भारताच्या मैत्रीपर्वाची सुरूवात : के. पी. ओली

 नवी दिल्ली/प्रतिनिधी । 21 - भारत आणि नेपाळदरम्यान असलेले गैरसमजुतीचे वातावरण निवळले असून, मैत्रीपर्वाची नव्याने सुरवात झाली असल्याचे नेपाळचे पंतप्रधान खड्गप्रसाद शर्मा ओली यांनी शनिवारी म्हटले आहे. सहा दिवसांच्या भारत दौर्‍यावर आलेल्या ओली यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.भारत आणि नेपाळदरम्यान आज विविध क्षेत्रांशी निगडित सात करारांवर सह्या करण्यात आल्या. 
नेपाळमधील राज्यघटनेविरोधात सुरू झालेल्या आंदोलनानंतर नेपाळ आणि भारतामधील संबंध तणावाचे झाले होते. व्यापारी मार्ग बंद पडल्याने नेपाळने नाराजी व्यक्त केली होती. आता मात्र सर्व पूर्ववत झाले असून अविश्‍वास आणि तणाव संपुष्टात आल्याचे ओली यांनी सांगितले. भारतात दाखल झाल्यावर ओली यांचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी स्वागत केले होते. शनिवारी ओली यांचे लष्करातर्फे सलामी देत अधिकृत स्वागत करण्यात आले. यानंतर त्यांनी हैदराबाद हाउसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ऑक्टोबरमध्ये सत्ता स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्या विदेश दौर्‍यावर आलेल्या ओली यांच्याबरोबर 77 जणांचे शिष्टमंडळ आहे. पंतप्रधान मोदी आणि ओली यांनी व्यापार, राजकीय परिस्थिती यासह अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. दोघांमध्ये निर्माण झालेला तणाव दूर करून संबंध पूर्वपदावर आणणे, हा ओली यांच्या दौर्‍याचा उद्देश आहे. मोदी यांच्या भेटीपूर्वी ओली यांनी स्वराज यांच्याशीही चर्चा केली. पायाभूत सुविधा, राजकारण, द्विपक्षीय संबंध, सार्क उपग्रह अशा मुद्द्यांवर ही चर्चा झाली. ओली यांच्या दौर्‍यादरम्यान, मधेशी समाजाच्या मागण्यांचा विचार करून नवी राज्यघटना अधिक सर्वसमावेशक करण्याचे त्यांना भारताकडून सांगितले जाऊ शकते. ओली यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी राधिका शाक्य, उपपंतप्रधान कमल थापा, अर्थमंत्री बिशू पौड्याल, गृहमंत्री शक्ती बस्नेत आले आहेत. नेपाळला भारतातील विशाखापट्टणमसह काही बंदरे व्यापारासाठी खुली करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. यामुळे नेपाळला मोठा फायदा होणार आहे. या
शिवाय भूकंपामुळे नष्ट झालेल्या पायाभूत सुविधांसाठी 25 कोटी डॉलर, रस्त्यांचे जाळे निर्माण करणे, दोन्ही देशांमधील संगीत आणि नाटक अकादमींमध्ये करार, बांगलादेशमार्गे दळणवळण व्यवस्था निर्माण करणे या बाबींचा या सामंजस्य करारांमध्ये समावेश आहे. ओली यांच्या उपस्थितीत मुझफ्फरपूर -धालकेबार वीज पारेषण मार्गाचेही उद्घाटन करण्यात आले.