Breaking News

इंग्रजी शाळांच्या मनमानी शुल्कवाढीविरोधात पालक आक्रमक

मुंबई, प्रतिनिधी, दि. 23 -  शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि त्यांच्या शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांचा आशीर्वादाने मुंबई आणि परिसरातील कॉन्व्हेट आणि इंग्रजी माध्यमांच्या इंटरनॅशनल शाळांनी वाट्टेल तशी मनमानी करत आपली शुल्कवाढ सुरू ठेवली आहे. या शाळांच्या मनमानीमुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून याचे पडसाद शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या मतदारसंघात असलेल्या एस.ई. इंटरनॅशनल शाळेत उमटले. या शाळेच्या मनमानी शुल्कवाढीविरोधात पालकांसोबत मनसेच्या कार्यकर्त्यांनी शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात मोर्चा काढून आपला क्षोभ व्यक्त केला. एस.ई. इंटरनॅशनल शाळेकडून मनमानी शुल्क वाढवून पालकांची लूट केली जात असून त्यासाठी एकदाही पालकांना विश्‍वासात घेतले जात 
नाही. त्यातच शिक्षण विभागाच्या नियमानुसार मागील पाच वर्षापासून या शाळेने पालक-शिक्षक समितीही नेमली नाही. खेळाचे मैदान नसतानाही त्यासाठीचे शुल्क आकारले जाते. तर शाळा सोडल्यानंतर शाळेचा दाखला सर्वत्र मोफत दिला जात असताना दाखल्यामागे दीड हजार रुपये शुल्क आकारले जात आहे. या मनमानीविरोधात पालकांनी हा मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला असल्याची माहिती या मोर्चाचे नेतृत्व करणारे मुंबई विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी दिली. या मोर्चात पालकांसोबत मनसेचे दहिसर विभागाचे संजय घाडी, अवधूत चव्हाण, राजेश येरूणकर, मनविसेचे प्रितेश मांजरेकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याच मतदारसंघात अशा प्रकारे एखाद्या शाळेची मनमानी सुरू असतानाही राज्यातील इतर शाळांच्या शुल्कवाढीला ते कसे काय आळा घालणार, असा सवाल  वेळी पालकांनी उपस्थित करून तावडेंविरोधातही घोषणाबाजी केली.