भूमाताच्या महिलांना पोलिसांनी अडवले
अहमदनगर । प्रतिनिधी । 23 - भुमाता रणराघीनी संघटनेच्या पदाधिकारी महिला सोमवारी दुपारी शनिशिंगणापूर येथे जाऊन शैनेश्वर देवस्थानचे विश्वस्त व गावकर्यांबरोबर चर्चा करणार असल्याचे भुमाता संघटनेच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी जाहिर केले होते.
त्यानुसार भुमाता संघटनेच्या महिला सोमवारी दुपारी शनिशिंगणापूरकडे जात असतांना पोलिस पथकाने त्यांना अडवून ताब्यात घेतले. सर्वांची रवानगी पोलिस मुख्यालयातील रिक्रेशन हॉल येथे करण्यात आली. यावेळी मुख्यालयाच्या गेटवर मिडीयाच्या प्रतिनिधींना अडविण्यात येऊन आत जाण्यास प्रतिबंध करण्यात आला. ही भुमिका उपअधिक्षक बनसोडे यांनी घेतली.
भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना सुरुवातीस नगर पुणे रस्त्यावरील केडगाव बायपासजवळ अडविण्यात आले. शनिशिंगणापूर येथे न जाता शासकीय विश्रामगृह येथे बैठकीत चर्चा करावी अशी भुमिका पोलिसांनी मांडली. मात्र, आपण शनिशिंगणापूर येथेच चर्चा करणार असल्याची भुमिका देसाई यांनी घेतली. त्यामुळे पोलिसांनी तृप्ती देसाई यांच्यासह शनिशिंगणापूर येथे जाणार्या महिलांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून उपअधिक्षक बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने सर्व महिलांना औरंगाबाद रोडवरील मनपा समोरील रस्त्यावरुन वाहनांसह ताब्यात घेतले. यामुळे बराच वेळ रस्त्यावर गोधळ सुरु होता.
भुमाता संघटनेच्या महिलांना पोलिसांच्या वाहनांमध्ये बसवून पोलिस मुख्यालयाच्या हॉलमध्ये आणण्यात आले. यावेळी पोलिस मुख्यालयाच्या गेटवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महिला पदाधिकार्यांचा मिडीयाशी संपर्क होऊ नये यासाठी पत्रकारांना अडविण्यात आले. या भुमिकेबाबत संताप व्यक्त करण्यात आला.