जिल्हाधिकारी कार्यालयावर वाहन धारकांचा मोर्चा
नाशिक/प्रतिनिधी। 20 - राज्य शासनाच्या मोटार वाहन अधिसूचनेच्या जाचक अटी-नियमांच्या निषेधार्थ जिल्हा सर्वपक्षीय रिक्षा-टॅक्सी, ट्रकधारक कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. शासनाने येत्या पंधरा दिवसांत मागण्यांबाबत निर्णय न घेतल्यास मार्चपासून सार्वजनिक वाहतूक बेमुदत बंद ठेवण्याचा इशाराही मोर्चेकर्यांनी दिला आहे.
भालेकर मैदानापासून सकाळी 11 वाजता निघालेल्या या मोर्चात शिवसेना वाहतूक सेना, पिपल्स रिपब्लिकन पार्टी प्रणित राष्ट्रीय मजदूर रिक्षाचालक मालक सेना, श्रमिक सेना, भद्रकाली अँटो रिक्षा युनियनचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर अडविण्यात आला. वाहनाच्या विविध परवाना शुल्कातील वाढ मागे घेण्यात यावी, शहरातील अकार्यक्षम पोलीस अधिकार्यांच्या तत्काळ बदल्या करण्यात याव्यात, शहरात पार्किँग व नो पार्किँग झोनचे फलक लावण्यात यावेत, शहर वाहतूक शाखा व खाकी पोलिसांकडून वाहन तपासणीचा जाच कमी करावा, रिक्षा, टॅक्सी, ट्रकधारकांचे सर्व्हे केलेल्या थांब्यावर ताबडतोब फलक लावण्यात यावेत, शहरात दुचाकीस्वारांना हेलमेटची सक्ती करू नये आदि मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मोर्चात शिवाजी भोर, हैदर सय्यद, शशी उन्हवणे, भगवंत पाठक, अजय बागुल, तेजिंदरसिंग बिंद्रा, मामा राजवाडे, जितू तुंगार, जावेद पठाण, राहुल मैंद, राहुल तूपलोंढे, संजय भालेराव, नितीन काळे आदि उपस्थित होते.